महानगरपालिकेच्या विद्या निकेतन आणि अंकुश बोऱ्हाडे या शाळेतील विद्यार्थी हे जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. कारण पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा शस्त्रसाठा असलेल्या खोलीलगत या विद्यार्थ्यांचे वर्ग भरत आहेत. गंभीर बाब म्हणजे बालवाडीतील मुले या खोली लगतच असलेल्या वर्गात मुळाक्षरे गिरवत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे पालक वर्गही आक्रमक झाला असून हा शस्त्रसाठा दुसरीकडे हलवावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी मात्र हा शस्त्रसाठा धोकायदायक नसल्याचे म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय हे निगडी प्राधिकरण येथील महापालिकेच्या अंकुश बोऱ्हाडे शाळांच्या इमारतीच्या तळमजल्यावर आहे. त्याला लागूनच पालिकेची विद्या निकेतन शाळाही आहे. या शाळांमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, शाळेच्या तळमजल्यावर असलेल्या पोलीस मुख्यालयाच्या खोलीत पोलीस आयुक्तालयातील बंदुका, अश्रधुराच्या नळकांड्या, काडतुसे यांसह पोलिसांच्या गरजेचा अन्य दारूगोळा कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आला आहे. मात्र, खोलीच्या भिंती लगतच बालवाडीचा वर्ग भरवला जातो, त्याच्याच बाजूला पाचवीच्या विद्यार्थ्यांचा देखील वर्ग भरतो. शस्त्रधारी पोलिसांच्या समोरून हे विद्यार्थी वर्गात प्रवेश करतात. महापालिकेच्या शाळेच्या इमारतीतील तळमजल्यवरील खोल्या भाडेतत्वावर पोलीस आयुक्तालयाच्या शस्त्र आणि मुख्यालयासाठी देण्यात आली आहे.
दरम्यान, पोलीस मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर पालिकेची दुसरी विद्या निकेतन शाळा आहे. त्या ठिकाणीही शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शेजारच्या शाळेच्या इमारतीत शस्त्रसाठा असल्याने इथल्या विद्यार्थ्यांबाबतही भीती व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीवर पालक मात्र संतापलेले असून यावर संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून शस्त्रसाठा इतरत्र हलवावा, अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली आहे.
शस्त्रसाठ्याच्या जागेला कडक सुरक्षा, घाबरण्याचे कारण नाही – अप्पर पोलीस आयुक्त
दरम्यान, शस्त्रसाठा आणि दारुगोळा ठेवलेल्या ठिकाणी आवश्यक ती काळजी घेतली गेली असल्याने ही जागा धोकादायक नाही. एखाद्या वस्तूचा स्फोट होईल अशी कुठलीही वस्तू तिथे ठेवलेली नाही. त्यामुळे गैरसमज बाळगण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण याबाबत अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे.