18 January 2021

News Flash

शाळा बंद, तरी ताटवाटय़ा खरेदीचा घाट

प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून निविदा प्रक्रिया

(संग्रहित छायाचित्र)

करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद असताना शाळांसाठी स्वयंपाकासाठीच्या साहित्याची खरेदी करण्याचा घाट प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घातला आहे. स्वयंपाकघर साहित्याच्या खरेदीसाठी ७८ कोटींची निविदा प्रक्रिया संचालनालयाकडून राबवण्यात आली आहे. मात्र, निधीची चणचण असताना आणि शाळा बंद असताना ताटवाटय़ांची खरेदी कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिक्षण विभागाकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि शासन अनुदानित शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबवली जाते. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेत भोजन दिले जाते. मात्र, मार्चपासून करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर शाळा बंद आहेत. केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार पोषण आहार धान्याच्या रूपात विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला. २३ नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत, मात्र पहिली ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. असे असताना प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून शाळांना देण्यासाठी स्वयंपाकासाठीच्या साहित्याच्या खरेदीचा घाट घालण्यात आल्याचे समोर आले आहे. संचालनालयाकडून शाळांना ताट, वाटय़ा, चमचे, पातेली आदी साहित्य पुरवले जाणार आहे. या साहित्याची खरेदी निविदा प्रक्रियेतून करण्यात येईल. त्यासाठी ७८ कोटींचा निधी खर्च के ला जाणार आहे. खरेदी केलेले साहित्य प्राधान्याने जिल्हा परिषदेच्या शाळांना देण्यात येईल.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. शालेय पोषण आहाराचे लाभार्थी असलेले विद्यार्थी शाळेत येत नसल्याने आहार शाळांमध्ये शिजवलाच जात नाही. मग ७८ कोटींची खरेदी आताच करण्याचे कारण काय, शासनाकडे निधीची चणचण असताना हा खर्च कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकार योग्य वेळी निर्णय घेईल. त्या वेळी स्वयंपाकाचे साहित्य शाळांना आवश्यक आहे. तसेच या साहित्याची खरेदी करून पाच वर्षे होऊन गेल्याने बऱ्याच ठिकाणचे हे साहित्य खराब झाले आहे. त्यामुळे शाळांना नवे साहित्य दिले जाणार आहे. – दत्तात्रय जगताप, प्राथमिक शिक्षण संचालक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 12:37 am

Web Title: school closed but trays for shopping abn 97
Next Stories
1 साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीडॉ. जयंत नारळीकर यांच्या नावाची चर्चा
2 राज्यातील तापमानात घट
3 पुण्यात पेट्रोल ९१ रुपये लिटर
Just Now!
X