पुस्तकी अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिकदृष्टय़ा सर्वागीण विकास व्हावा, या हेतूने पिंपरी महापालिकेच्या वतीने होत असलेल्या शालेय क्रीडा स्पर्धा कोणतेही सबळ कारण न देता गेल्या १२ वर्षांपासून बंद करण्यात आल्या आहेत. मैदाने, स्टेडियम, क्रीडा शिक्षक, स्वतंत्र क्रीडा विभाग, क्रीडा समिती अशी भरगच्च व सुसज्ज यंत्रणा असतानाही महापालिकेचे शालेय स्पर्धाच्या बाबतीत उदासीन धोरण का, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
पिंपरी पालिकेच्या १३६ प्राथमिक शाळा असून १८ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये जवळपास ६० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या स्थापनेपासून शालेय स्तरावरील स्पर्धा घेतल्या जात होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्या बंद करण्यात आल्या आहेत. क्रीडाविषयक साहित्य उपलब्ध असूनही त्याचा विद्यार्थ्यांसाठी वापर होत नाही, ही बाब पालिकेच्या लौकिकास साजेशी नाही, असा मुद्दा शिक्षण मंडळाचे सदस्य निवृत्ती शिंदे यांनी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना दिलेल्या पत्रात उपस्थित केला आहे. इंटरनेट, केबल, टीव्ही व संगणकयुगात विद्यार्थी क्रीडांगणावर दिसला पाहिजे, त्यादृष्टीने स्पर्धाचे महत्त्व आहे, असे शिंदेंनी पत्रात म्हटले आहे. त्याची दखल घेत शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी आशा उबाळे यांनी सात डिसेंबरला चिंचवडच्या महात्मा फुले विद्यालयात एका विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. विद्यार्थी गुणवत्तावाढ, इंग्रजीचे ज्ञान असलेल्या शिक्षकांची नियुक्ती, शारीरिक शिक्षणाच्या तासांमध्ये विविध खेळांचा समावेश, केंद्र पातळीवर हिवाळी क्रीडा स्पर्धाचे आयोजन, खेळांचे साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे, वेळोवेळी वर्गाचे मूल्यमापन करणे, स्कॉलरशिपचे वर्ग घेणाऱ्या शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण असे विषय बैठकीत चर्चिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.