‘इंडियन सायन्स काँग्रेस’वर नोबेलविजेत्या शास्त्रज्ञांनी केलेली टीका आणि शास्त्रज्ञांची पुरस्कारवापसी या संदर्भात विचारल्या गेलेल्या प्रश्नाला उत्तरे देताना केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी शास्त्रज्ञ नाराज नसल्याचा निर्वाळा दिला. डॉ. हर्ष वर्धन ‘राष्ट्रीय कोषिका विज्ञान केंद्रा’ला (एनसीसीएस) बुधवारी भेट दिली. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
भारतीय वंशाचे नोबेलविजेते वेंकटरमन रामकृष्णन यांनी जानेवारीत म्हैसूरला झालेल्या सायन्स काँग्रेससाठी आपण उपस्थित राहणार नसल्याचे सांगताना या परिषदेचे वर्णन ‘सर्कस’ असे  केले होते. ‘२०१५ मध्ये आपण या परिषदेला गेलो होतो, पण तिथे विज्ञानाची चर्चा फारच कमी होते,’ असे ते म्हणाले होते. याबाबत तसेच शास्त्रज्ञांच्या पुरस्कार वापसीबाबत विचारलेल्या प्रश्नावर   डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, ‘ही परिषद १०३ वर्षे जुनी आहे व तिथे १५ हजार शास्त्रज्ञ होते. तो एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे, असे असताना कुणीतरी त्याला सर्कस म्हणते हे बरोबर नाही. मी देशातील ८० टक्के वैज्ञानिक प्रयोगशाळांना भेटी दिल्या असून तिथल्या लोकांशी सविस्तर बोललो आहे. मला नाराज असलेली एकही व्यक्ती भेटली नाही. तुमच्यासमोर असलेल्या अडचणींशी जुळवून घेणे तुम्ही शिकून घ्यायला हवे. सुदैवाने विज्ञानासाठीच्या निधीत कपात करण्यात आलेली नाही,’
डॉ. हर्ष वर्धन यांनी एनसीसीएसमधील संशोधकांशीही संवाद साधला. व्यक्तीच्या जनुकीय रचनेनुसार केल्या जाणाऱ्या औषधयोजनेबाबत (पर्सनलाईज्ड अँड प्रीसिजन मेडिसिन) हे क्षेत्र विकसित होत असून एनसीसीएसने त्यात कर्करोगावर काम सुरू करावे, असे त्यांनी सांगितले. व्याख्यानात ते म्हणाले, ‘कर्करोग व इतर आजारांवरील उपचार सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. केमोथेरपी वा रेडिओथेरपीवरील उपचारांसाठी आपली मालमत्ता विकावी लागलेले लोक मी पाहिले आहेत. आर्थिकदृष्टय़ा परवडणाऱ्या व उत्तम दर्जाच्या उपचारांसाठीच्या संशोधनांची सध्या अपेक्षा आहे. संशोधनाचे लक्ष्य ठरवणे व ते ठराविक कालावधीत पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम करणे गरजेचे आहे. ’
 ‘झीका’ तापाचा सामना करण्यासाठी आरोग्य खाते तयार’
‘माझ्याकडे आरोग्य खाते होते तेव्हा जागतिक स्तरावर ‘इबोला’चे संकट होते. त्याबाबत आपले शास्त्रज्ञ, डॉक्टर व सार्वजनिक आरोग्य खात्याच्या मंडळींनी कडक नजर ठेवून काम केले व देशात इबोलाचा एकही रुग्ण झाला नाही,’ असे डॉ. हर्ष वर्धन म्हणाले. ‘सध्या माझ्याकडे ते खाते नसले तरी आरोग्य विभागाचे लोक ‘झीका’ तापाविषयी दक्ष असल्याचे दिसून येते. जागतिक आरोग्य संघटनेने ‘झीका’ हा ‘इबोला’इतका घातक नसल्याचे म्हटले आहे. परंतु शक्य तेवढी खबरदारी घेणे गरजेचे आहे,’ असेही ते म्हणाले.