News Flash

‘निपा’चा नि:पात दृष्टिपथात

‘आयसर’च्या वैज्ञानिकांनी विषाणूची प्रथिनरचना उलगडली

(संग्रहित छायाचित्र)

जीवघेण्या निपा या संसर्गजन्य रोगावरील संभाव्य औषधासाठीचे पूरक संशोधन भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर) वैज्ञानिकांनी केले आहे. निपा विषाणूतील नऊ  प्रथिनांची जनुकीय संकेतावली उलगडून त्याची त्रिमिती प्रारूपे तयार करण्याबरोबरच त्यांचा परिणाम रोखणारे सुमारे १५० संभाव्य औषधी रेणू वैज्ञानिकांनी शोधले असून, निपावर औषध तयार करण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरू शकेल.

वटवाघळे आणि डुकरांपासून निपा विषाणूचा संसर्ग माणसाला होतो. एकदा लागण झाल्यानंतर तो माणसांपासून माणसांतही पसरू शकतो. केरळमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव दोनदा आढळला होता. निपाचा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी बांगलादेश आणि भारतातील ७२ ते ८६ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. १९९८मध्ये निपाचा शोध लागल्यानंतर आजपर्यंत त्यावर जालीम औषध किंवा प्रतिबंधक लस उपलब्ध नाही.

या पार्श्वभूमीवर आयसरमधील चमूचे संशोधन वरदान ठरू शकते. प्रा. एम. एस. मधुसूदन यांच्यासह नीलाद्री सेन, तेजश्री कानिटकर, कौस्तुभ अमृतकर, श्रेयस सुपेकर, अंकित रॉय, नीलेश सोनी, संजना नायर, गुलजार सिंग यांनी हे संशोधन केले आहे. हे संशोधन ‘प्लॉस निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसिजेस’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनासाठी वेलकम ट्रस्ट डीबीटी इंडिया अलायन्स, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) यांनी निधी उपलब्ध करून दिला.

प्रा. एम. एस. मधुसूदन यांनी सांगितले, की संशोधनाद्वारे निपा विषाणूतील प्रथिनरचना उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. कुठल्याही विषाणूवर औषध शोधताना त्याची प्रथिनरचना कळणे गरजेचे असते. कारण या प्रथिनांमुळेच विषाणूचा मानवात संसर्ग होऊन लक्षणे दिसतात. त्यामुळे प्रथिनांची रचना कळल्यानंतर त्यांच्यावर औषधांच्या माध्यमातून नेमका कसा प्रतिहल्ला करायचा याची व्यूहरचना ठरवता येते. हेच पायाभूत संशोधन करण्यात आले.

प्रतिहल्ल्याची दिशा

या विषाणूंच्या प्रथिनांमधील अमायनो आम्लांच्या साखळ्यांचा उलगडा करण्यात यश आल्याने या विषाणूच्या प्रथिनांवर नेमका कसा प्रतिहल्ला करायचा हे समजले आहे. या रेणूंची त्रिमिती प्रारूपे औषधी रेणूंचा परिणाम तपासण्यासाठी उपयोगी पडणार असून, ती संशोधनासाठी खुली करण्यात आली आहेत.

१३ रेणूंची करामत : वैज्ञानिकांनी शोधलेल्या एकूण १५० औषधी रेणूंपैकी निवडलेले १३ रेणू प्रथिनांना जाऊन चिकटतात आणि त्यांचे काम रोखतात. हे रेणू निपा विषाणूच्या सर्वच प्रकारांवर उपयोगी ठरण्याची आशा आहे. यात संभाव्य औषधी रेणू शोधताना संगणनात्मक तंत्राचा वापर केला. निपा विषाणू हानीकारक असल्यामुळे या रोगावर उपाय शोधण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचे आहे.

संशोधन काय? : आयसरमधील वैज्ञानिकांनी निपा विषाणूच्या नऊ  प्रथिनांची त्रिमिती प्रारूपे तयार करून त्यांचे कार्य रोखणारे संभाव्य १५० रेणू शोधले आहेत. तसेच, जैविक संगणनाच्या मदतीने अलगॉरिथम तंत्राच्या साहाय्याने ४ पेप्टाइड प्रतिबंधक रेणू आणि १४६ साध्या प्रतिबंधात्मक रेणूंचा शोध घेण्यात आला. हे रेणू निपा विषाणूच्या प्रथिनांचे काम रोखतात. त्यामुळे त्यांच्या संसर्गाने होणाऱ्या हानीला प्रतिबंध होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2020 1:22 am

Web Title: scientists at eicer have uncovered a virus protein abn 97
Next Stories
1 ‘विदेशी विद्यार्थीस्नेही’ भारतासाठी विचारमंथन
2 VIDEO : ४०० फुट उंचीवर अरुण सावंत यांना गिर्यारोहकांनी वाहिली श्रद्धांजली 
3 माझ्यासारख्या शिवसैनिकाला खरा नेता पाहण्याची इच्छा : अमृता फडणवीस
Just Now!
X