आज संध्याकाळपासून रेल्वे स्टेशन, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुन्या हायवेवर स्क्रिनिंग केलं जाणार आहे अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. उद्यापासून विमानतळावर उतरणाऱ्या सगळ्या प्रवाशांना विलीगीकरण कक्षात ठेवलं जाणार आहे. ६५ वर्षांवरच्या नागरिकांनी सतर्क रहावं असंही त्यांनी म्हटलं आहे. जीवनावश्यक वस्तू म्हणजे भाजीपाला, डाळी, धान्य, दूध यांची कमतरता भासू देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुढील सूचनेपर्यंत सेतू कार्यालयं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच पुण्यात रजिस्ट्रेशन्सही बंद करण्यात आली आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी मिळून एकूण १९ करोनाग्रस्त आहेत. शहरातील १ लाख ७४ हजार २३५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १० संशयितांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पुण्यात आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांना १०० टक्के वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात कालच सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र एक दिवसातच ते पाळलं जाईल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे पुढच्या दोन दिवसात हे पूर्णपणे अंमलात आणलं जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे.