केंद्रात भाजप सरकार सत्तेत येऊन तीन वर्षांचा कालावधी होऊन गेला. त्याआधी देशाची अर्थव्यवस्था चांगली होती. मात्र, या सरकारच्या नोटाबंदीसह अन्य काही निर्णयांमुळे विकास दरात घट झाली असून अर्थव्यसवस्थेवर याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे घोषणाबाजी न करता अर्थव्यवस्थेला गती देण्यावर भर द्यावा, असा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सरकारला दिला आहे. वसंतदादा पाटील जन्मशताब्दीनिमित्त पुण्यातील कार्यक्रमात ते बोलत होते.

नोटाबंदीच्या काळात एकतरी श्रीमंत व्यक्ती बँकेसमोरील रांगेत दिसली का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी नोटाबंदीचा निर्णय सर्वसामान्य जनतेसाठी त्रासदायक ठरल्याचे म्हटले. नोटाबंदी वेळी कोणताही श्रीमंत व्यक्ती रांगेत दिसला नाही किंवा रांगेत उभा राहून त्याचा मृत्यू झाला नाही. हा निर्णय घेऊन किती काळा पैसा बाहेर आला हे कधी समजणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना रिझर्व्ह बँकेला पूर्व कल्पना द्यायला हवी होती. मात्र, ८ नोव्हेंबरला अचानकपणे रात्री ८ वाजता नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. सरकारला सर्जिकल स्टाईकची सवय आहे. त्यामुळे त्यांनी अर्थव्यवस्था कॅशलेस करण्याऐवजी लोकांना कॅशलेस केले. जिथे रेल्वेलाईन नाही तिथे ऑनलाईन प्रणाली सुरू आहे, असा टोमणा त्यांनी सरकारला लगावला. सध्या अर्थव्यवस्था ढासळली असून विकासदर देखील घसरला आहे. परिणामत: देशातील सर्वसामान्य जनतेवर त्याचा ताण पडत आहे. यावर सरकारने योग्य पावले उचलली नाहीत, तर येत्या काळात देशात गंभीर परिस्थिती निर्माण होईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.

वस्तू व सेवा कर प्रणाली राबवण्यात सरकारला अपयश आल्याचेही त्यांनी सांगितले. वस्तू व सेवा कर प्रणाली अर्थव्यवस्थेसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र, ही व्यवस्था कशी राबवली जाऊ नये, याचे भारत उत्तम उदाहरण आहे, अशा शब्दांत त्यांनी भारतात राबवण्यात आलेल्या कर प्रणालीवर टीका केली. यावेळी भाजपचे खासदार नाना पटोले म्हणाले की, राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागण्याआधीच राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा जाहिर केला होता. छगन भुजबळ हे महात्मा फुलेंचे वंशज आहेत. त्यांना तुरुंगात डांबण्याचे पाप या सरकारने केले आहे. भुजबळ जर चोर असतील तर हे डाकु आहेत, अशा शब्दात त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला.