19 October 2019

News Flash

सेट परीक्षा ३० जून रोजी ; यंदा परीक्षा ऑफलाइनच

नेट परीक्षेत बदल झाल्यामुळे सेटमध्येही बदल करण्यात आले आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोव्यात घेतली जाणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) ३० जूनला होणार आहे. फेब्रुवारीमध्ये परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. यंदा या परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून, सेटसाठीही दोनच प्रश्नपत्रिका असतील. मात्र ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहे.

नेट परीक्षेत बदल झाल्यामुळे सेटमध्येही बदल करण्यात आले आहे. त्यानुसार सेटसाठी आता ३५० गुणांसाठीच्या तीन प्रश्नपत्रिकांचे रुपांतर दोन प्रश्नपत्रिकांमध्ये करण्यात आले आहे. त्यानुसार पहिली प्रश्नपत्रिका १०० गुणांसाठी, तर दुसरी प्रश्नपत्रिका २०० गुणांसाठी असेल. प्रश्नांच्या स्वरुपातही बदल करण्यात आले असून, पहिल्या प्रश्नपत्रिकेसाठी ६० ऐवजी ५० प्रश्न असतील, तर दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत १०० गुण असतील. प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम मार्चपर्यंत पूर्ण केले जाईल, असे सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी दिली.

परीक्षेचा अर्ज ऑनलाइनच भरावा लागणार आहे. मात्र, ऑनलाइन अर्ज आधार कार्डला जोडण्यात आल्याने उमेदवारांकडे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. निकालाच्या स्वरुपात बदल करण्यात आला असून, दोन्ही प्रश्नपत्रिका दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार सहा टक्के उमेदवार पात्र ठरवले जातील. त्यानंतर दोन्ही प्रश्नपत्रिका मिळून किमान ४० टक्के (खुला प्रवर्ग) किंवा ३५ टक्के (आरक्षित प्रवर्ग) गुण मिळवलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल. त्यानुसार सर्वाधिक गुण मिळवलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करून सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरवले जाईल.

ऑनलाइन करण्याचा प्रयत्न

जूनमध्ये होणारी सेट परीक्षा ऑफलाइनच होणार आहे. मात्र, त्यापुढील परीक्षा ऑनलाइन करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक सोयीसुविधांचा आढावा घेतला जाईल.

First Published on January 12, 2019 8:00 am

Web Title: set 2019 set exam on 30 june