News Flash

नामवंतांचे बुकशेल्फ : वैविध्यपूर्ण वाचन हा शाहिरीचा प्राण

पोवाडा लिहिण्याला सुरुवात केल्यानंतर माझा वाचनप्रवास सुरू झाला. रात्री

शाहीर दादा पासलकर (अध्यक्ष, महाराष्ट्र शाहीर परिषद)

महानगरपालिकेच्या २४ नंबर शाळेत पाचवीमध्ये असताना मला लोककला आणि लोकगीतांचे वेड लागले. माझे शिक्षक रा. बा. कांबळे यांचा त्यामध्ये महत्त्वाचा वाटा होता. सहावीमध्ये मी बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर शाळेत प्रवेश घेतला. शाळेच्या प्रत्येक स्नेहसंमेलनामध्ये लोकगीते सादर करू लागलो. सलग चार वष्रे विविध विषयांवर पोवाडे लिहिण्याचा माझा प्रयत्न सुरू होता. इयत्ता आठवीमध्ये ‘कोयनानगरचा धरणीकंप’ हा माझा पहिला स्वरचित पोवाडा. वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्या, संदर्भ वाचून त्यावर टिपण काढत मी तो पोवाडा लिहिला होता. तो पोवाडा इतका गाजला, की त्यातून मला मिळालेल्या प्रेरणेने आजपर्यंत मी ४० पोवाडे, २०० गीते आणि ६० नाटकांच्या संहिता असे लेखन करू शकलो. हे लेखन आणि सादरीकरण करताना मी केलेले वाचनच मला उपयोगी पडले. कोणत्याही संदर्भाशिवाय पोवाडा लिहिणे अशक्य आहे. त्यामुळे अवांतर वाचन हा शाहिरीचा प्राण आहे, हा मंत्र मी कायम लक्षात ठेवला.

पोवाडा लिहिण्याला सुरुवात केल्यानंतर माझा वाचनप्रवास सुरू झाला. रात्री जागून पुस्तके वाचायची आणि त्या पुस्तकाविषयी काय वाटले, हे लिहून ठेवायचे, असा छंद मला लागला. बाबा कदम, बाबुराव अर्नाळकर यांची पुस्तके मी वाचत असे. सई परांजपे यांच्या ‘सळो की पळो’ या नाटकात मी काम केले. त्यानंतर ‘राजा शिवाजी’ या व्यावसायिक बालनाटय़ात सहभाग घेतला. त्यामुळे ऐतिहासिक पुस्तकांचे वाचन हळूहळू सुरू झाले. श्रीमान योगी, छावा, मृत्युंजय या कादंबऱ्या मी खरेदी केल्या. एखादे पोवाडय़ाचे पुस्तक दिसले तर ते आवर्जून घ्यायचे आणि नोंदी काढायच्या, असा परिपाठ आजही सुरू आहे. ‘कोयनानगरचा धरणीकंप’ या माझ्या पहिल्या पोवाडय़ाला माझे शिक्षक प्र. मो. जोशी यांची दाद मिळाली आणि शाळेमध्ये असतानाच मला ‘शाहीर’ ही पदवी सगळय़ांनी बहाल केली. लोकमान्य टिळक आणि सरस्वती मंदिर संस्था यांच्यावर आधारित मी एक पोवाडा लिहिला आणि आमचे मुख्याध्यापक दादासाहेब गुप्ते यांना दाखविला. त्यांच्याकडून मिळालेली दाद मला आजही तितकीच मोलाची वाटते. शाळा निर्मितीची माहिती जुन्या नियतकालिकांमधून घेत मी त्यावर पोवाडय़ाचे लेखन केले होते.

विविध वर्तमानपत्रांमधून येणारी सदरे व्यक्तींविषयी आणि विविध घटनांविषयी विस्तृत माहिती देतात. त्यामुळे त्याचे संकलन करणे, हे मला अधिक आवडते. पुस्तकांचे वाचन आणि वर्तमानपत्रांतील कात्रणांचा संग्रह या दोन गोष्टींनी शाहीर उत्तम रीतीने समाजासमोर आपले म्हणणे मांडू शकतो. नाटय़क्षेत्राविषयी पटकन आशय सांगणारी कृष्णकांत नाईक यांची पुस्तके मला फार आवडायची. त्यामुळे तसा पुस्तकातील मोठा टाइप पाहून आजही मी पुस्तकांची खरेदी करतो. शिवरायांचे शिलेदार- येसाजी कंक, बाजी पासलकर, कान्होजी आंग्रे यांच्यापासून ते पेशव्यांपर्यंत अनेक पुस्तके मी वाचून काढली आणि पोवाडे लिहिले.

विजयराव देशमुख यांचे ‘शककत्रे शिवराय’, प्रमोद मांडे यांचे ‘गड-किल्ले महाराष्ट्राचे’, ‘स्वातंत्र्यसंग्रामातील समिधा’, न. चिं. केळकर यांचे ‘ऐतिहासिक पोवाडे’ , पठ्ठे बापूरावांची ‘शाहिरी काव्ये’, भगवान चिल्ले यांची ‘गडांवरील पुस्तके’ अशा साहित्यातील संदर्भ मी पोवाडे लिहिताना आणि सादर करताना घेत होतो. पोवाडय़ातून बारीकसारीक घटनेचा अचूक संदर्भ देण्याकरिता वाचनाशिवाय पर्याय नव्हता.

आप्पा बळवंत चौकामध्ये त्या काळी प्रफुल्ल बुक डेपो नावाचे दुकान होते. तेथे मी संगीत नाटक आणि नाटय़रंगभूमीविषयीची दीडशे पुस्तके विकत घेतली. त्या काळी एक पुस्तक दीड रुपयाला असल्याने पुस्तके घेऊ शकलो. प्रकाश आमटे यांच्या ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकापासून ते अक्कलकोट स्वामी चरित्र, दासबोध, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी आदींची पुस्तके माझ्या संग्रही आहेत. तर कर्मवीर भाऊराव पाटील, स्वामी विवेकानंद यांची बक्षीस म्हणून मिळालेली पुस्तके मला विशेष भावलेली.

वीर बाजी पासलकर स्मारक मंडळातर्फे पानशेतच्या पुढे मोसे बुद्रुक गावी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पोवाडा सादर करण्यासाठी मला सांगण्यात आले. इतिहास संशोधक मंडळातून द. ना. पासलकर यांनी मला पोवाडा आणून दिला. परंतु मला त्यातील फारसे समजले नाही. त्या वेळी मी इतिहास संशोधक मंडळात जाऊन त्याविषयीचा इतिहास समजून घेतला. त्यातील संदर्भ काढले आणि नवा पोवाडा लिहिला. लहान असताना आजीच्या कडेवर बसून शाहीर दीक्षित, शाहीर िहगे, नानिवडेकर, बाबासाहेब देशमुख, सम्राट विभूते, शाहिरा अंबूताई यांचे ऐकलेले पोवाडे मी कानात साठवले होते. त्या पद्धतीने मी पोवाडे म्हणू लागलो आणि माझे वाचन व लेखन सुरू ठेवले.

आपल्याप्रमाणेच नवोदित कलाकारांनी देखील काहीतरी वाचावे, लिहावे असे सारखे वाटत होते. त्यामुळे १९९४ मध्ये मंगल थिएटर्स संस्कारशील नाटय़संस्थेची स्थापना केली. त्यामध्ये १५ ते ३० वर्षे या वयोगटांतील विद्यार्थी येत होते. लेखन, वाचन, अभिनय आणि माणूसपणाचे संस्कार करण्याचा हा प्रयत्न होता. त्याअंतर्गत मंगल मोफत वाचनालय सुरू केले. माझा विद्यार्थी दिग्पाल लांजेकर याच्याकडून मला प्रेरणा मिळाली. माझ्या घरातील फळीवरील पुस्तके पाहून त्यानेच मला सांगितले, की आपण याचे रेकॉर्ड करून वाचन विभाग तयार करू. त्यामुळे मला पुस्तकांचे अधिकच वेड लागले आणि विविध पुस्तके वाचनालयात असावी, यासाठी मी प्रयत्न करू लागलो. त्या वेळच्या कलाकारांकडे असलेली नाटक आणि संगीत रंगभूमीशी निगडित पुस्तके देण्याची मी विनंती केली. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि माझ्याकडे शेकडो पुस्तके जमा झाली. तर २०१०-११ ला पहिल्या मराठी शाहिरी साहित्यसंमेलनात ‘माझ्या इतिहासाचा साक्षीदार’ आणि ‘शाहिरी इतिहासाची पाने’ या माझ्या पुस्तकांचे प्रकाशन हा माझ्यासाठी सुवर्णक्षण होता. कोणत्याही समारंभात स्मृतिचिन्हाऐवजी मी पुस्तके भेट म्हणून देतो. पोवाडय़ातून आणि पुस्तकातून समाजाचे प्रबोधन होते. त्यामुळे शाहीर आणि पुस्तके हे दोन्ही महाराष्ट्राचे खरेखुरे प्राण आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 3:38 am

Web Title: shahir dada pasalkar book shelf
Next Stories
1 पुणे मेट्रोच्या भूमिपूजनावरून राजकीय डावपेच
2 स.प. महाविद्यालयाची ‘३०० मिसिंग’ महाअंतिम फेरीत
3 घरांचे व्यवहार थंडच; महसुलात निम्म्याहून अधिक घट
Just Now!
X