रस्ते तयार करताना ते रस्ते चांगले कसे राहतील, याबाबत राज्य सरकार धोरण तयार करते. अशा धोरणामध्ये काय चूक आहे? यासंदर्भात आंदोलन करणाऱ्यांना जनतेचा पाठिंबा मिळाला नाही, अशी टीका केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली. अतिरेकी बोलायचे व वेगळे चित्र निर्माण करायचे, असा प्रयत्न काही जण करीत आहेत, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सुवर्णमहोत्सवी अधिवेशन रविवारी पुण्यात झाले, त्या वेळी पवार बोलत होते. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, परिवहन राज्य मंत्री सचिन अहिर, आमदार बाप्पूसाहेब पठारे, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, सरचिटणीस हनुमंत ताटे, नगरसेवक महेंद्र पठारे त्या वेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कामगार संघटना एसटीतही कार्यरत आहे. या पाश्र्वभूमीवर पवार म्हणाले की, संघटना चालविताना ती मजबूत कशी करावी, याचा विचार झाला पाहिजे. पण, नेतृत्वावर टीका करायची, कामगारांचे प्रश्न सोडवू असा प्रसार करायचा व टोकाचे विचार मांडून अतिरेकी बोलून वेगळे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न काही जण करीत आहेत. एसटी प्रवाशांना सेवा देते व कामगारांची कुटुंबे चालवते. मात्र, अशा प्रवृत्तींच्या हातात शक्ती दिली, तर एसटी दुबळी होईल.
‘प्रवासी देवो भव’, असे धोरण एसटीने राबविले पाहिजे, असे सांगून पवार म्हणाले की, प्रवाशाचा सन्मान करून त्याला प्रतिष्ठा दिली पाहिजे. सरकारच्या माध्यमातून एसटीला पूर्ण ताकद मिळाली पाहिजे. त्यातून ही सेवा अधिक लोकप्रिय होईल. रास्त प्रश्नांची सोडवणूक केल्यास कामगार व एसटी फायद्यात येईल. राज्य सरकारच्या जागेतून एसटीच्या कामगारांची निवास संस्था स्थापन करणे त्याचप्रमाणे फंड जमा करून कामगारांच्या शिक्षणाचा खर्च करणे आवश्यक आहे. संघटनेमध्ये, त्याचप्रमाणे एसटीमध्ये महिलांना ३३ टक्के स्थान दिले पाहिजे.
अहिर म्हणाले की, उद्योग टिकला तर कामगार टिकेल व कामगार टिकला तर संघटना टिकेल. याच विचाराने काम केले पाहिजे. एसटी टिकविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्यासाठी एसटीची स्थानके बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.