पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास चीनकडून भारतीय जवानांवर हल्ला  करण्यात आला. या घटनेत भारताचे २० जवान शहीद झाले. तर त्याचवेळी आपल्या जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर देत चीनच्या ४० सैनिकांना ठार मारले. चीनच्या  या हल्ल्याचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात शिवसेनाच्यावतीने चायना मोबाइल व टीव्ही फोडून तसेच चीनचा झेंडा जाळून चीनचा निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले, चीनच्या हल्ल्यात आपले २० जवान  शहीद झाले असून, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला जशाच तसे उत्तर देण्याची गरज आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज चिनी वस्तू फोडून  निषेध व्यक्त केला जात आहे. आता यापुढील काळात आपण सर्वांनी चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकावा. तसेच, देशात उत्पादित होणार्‍या वस्तूची खरेदी करून आपल्या उद्योजकांना उभारी देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यात हिंसक झडप झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. भारतात चीनविरोधात संतापाची लाट उसळली असून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत आहे.