पिंपरी महापालिकेच्या ‘सारथी’ हेल्पलाईन सुविधेचा एक लाखाहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला असून २६ जानेवारीपासून सारथीच्या इंग्रजी आवृत्ती असलेल्या पुस्तिकेचे तसेच सीडीचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने शहरवासियांना पीएमपी, एसटी, रेल्वे व विमानसेवेची माहिती सारथीद्वारे मिळू शकणार आहे.
आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या पुढाकाराने १५ ऑगस्ट २०१३ पासून सुरू झालेल्या सारथी (८८८८००६६६६) हेल्पलाईनद्वारे महापालिकेच्या तसेच शासनाच्या विविध विभागांची माहिती देण्यात येते. आतापर्यंत एक लाख ८ हजार नागरिकांनी लाभ घेतला आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये ही योजना लोकप्रिय ठरली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह विविध नेत्यांनी तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी या योजनेचे कौतुक केले आहे. आता इंग्रजी आवृत्ती उपलब्ध होणार असून यापुढे हिंदीी आवृत्ती प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.