श्रीपाल सबनीस यांची टीका
कलावंत, साहित्यिक, विचारवंत यांचे कायम ऋण असलेल्या महाराष्ट्रातील कलावंत उपाशी मरत असताना मुख्यमंत्र्यांना पोटभर जेवण्याचा अधिकार नाही, असे मत मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी चिंचवड येथे बोलताना व्यक्त केले. विदर्भ, लातूर, मराठवाडय़ातून किती मुख्यमंत्री झाले, तरीही या भागातील समस्या कायमच आहेत, असे सांगून आजही लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागतो, हा सरकारचा पराभव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अण्णासाहेब मगर फाउंडेशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त दिलेल्या विविध पुरस्कारांचे वितरण सबनीस तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते देण्यात आले, तेव्हा ते बोलत होते. आमदार महेश लांडगे, सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष गुलाब बिरदवडे आदी उपस्थित होते.
सबनीस म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील शेतीचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. राज्यातील कृषी विद्यापीठे फक्त शोभेची झाली आहेत, त्यामध्ये संशोधन नावाचा प्रकारही शिल्लक नाही.’’
बापट म्हणाले, ‘‘सध्या स्वत:च्या जबाबदाऱ्या झटकून दुसरेच काम करण्याचा समाजाचा कल आहे. त्यामुळे समाजात नकारात्मक भूमिका मांडल्या जातात. माणूस संस्कारहीन होऊन जनावरांच्या रांगेत जाऊन बसायला सुरुवात झाली आहे. समाजात प्रतिकारशक्ती कमी होत चालली. मात्र, चांगल्या गोष्टींसाठी नक्की प्रतिकार करायला हवा.’’