‘ सीम स्वॅपिंग’चा पहिला गुन्हा दाखल

पुणे : कोथरूड भागातील एका नागरिकाकडे बतावणी करून चोरटय़ाने १८ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सचिन कुलकर्णी (वय ४५, रा. कोथरूड) यांनी या संदर्भात कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माहिती-तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलकर्णी एका खासगी कंपनीत कामाला आहेत.  ६ मे रोजी कुलकर्णी यांच्या मोबाइल क्रमांकावर अज्ञाताने संपर्क साधला होता. सीमकार्ड अद्ययावत करण्याची बतावणी त्यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर नवीन सीमकार्ड क्रमांक मोबाइल कंपनीला पाठवावा लागेल, अशी बतावणी त्यांच्याकडे करण्यात आली. कुलकर्णी यांनी संबंधित संदेश पाठविला. त्यानंतर चोरटय़ाने नवीन सीमकार्डचा गैरवापर करून कुलकर्णी यांच्या बँक खात्यातील १ लाख ८० हजार १४८ रुपये काढून घेतले.

कुलकर्णी यांचे डेक्कन जिमखाना भागातील भांडारकर रस्त्यावरील एका बँकेत खाते आहे. चोरटय़ाने ८ मे रोजी कुलकर्णी यांच्या बँकेत संपर्क साधला. कुलकर्णीच्या नावाने त्याने बँकेकडे १६ लाख ४५ हजार ३५२ रुपयांचे वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) मागितले. ऑनलाइन पद्धतीने हे कर्ज मंजूर करण्यात आल्यानंतर चोरटय़ाने कर्जापोटी मिळालेली रक्कम देखील स्वत:च्या खात्यात जमा केली. चोरटय़ाने एकूण मिळून १८ लाख २५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली, अशी माहिती कोथरूड पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली. पोलीस निरीक्षक बालवडकर तपास करत आहेत.

काय आहे सीम स्व्ॉपिंग ?

संभाषणातील त्रुटी (कॉल ड्रॉप), इंटरनेटचा वेग आदी त्रुटी दूर केल्या जातील. त्यासाठी फक्त सीमकार्ड अद्ययावत करावे लागेल, असे चोरटय़ांकडून सांगितले जाते. त्यानंतर चोरटा मोबाइल क्रमांकावर एक २० अंकी सीमकार्ड क्रमांक असलेला संदेश पाठवितो. हा संदेश पुन्हा १२३५४ या क्रमांकावर पाठविण्यास सांगितले जाते. संदेश पाठविल्यानंतर लगेचच सीमकार्ड बंद पडते. ज्या व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावर चोरटय़ाकडून संपर्क साधण्यात आला असेल, तो क्रमांक आपोआप चोरटय़ाकडील सीमकार्डवर सुरू होतो. त्यानंतर बँकेकडून येणाऱ्या संदेशाचा गैरवापर करून चोरटा बँक खात्यातून पैसे काढून घेतो.अशा प्रकारे एखाद्याने संपर्क साधल्यास  मोबाइल कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे किंवा बँकेत संपर्क साधावा. बँक खात्याशी जोडणी केलेला मोबाइल क्रमांक बदलून घ्यावा तसेच सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी केले आहे.

चूक बँकेचीच

कुलकर्णी यांनी १६ लाख ४५ हजार रुपयांचे वैयक्तिक कर्ज मागितले नव्हते. त्यांचे ज्या बँकेत खाते होते. त्या बँकेत चोरटय़ाने संपर्क साधून कुलकर्णी यांच्या नावाने वैयक्तिक कर्ज मागितले. हे कर्ज त्वरित मंजूर देखील करण्यात आले. तत्पूर्वी एकदा तरी कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून शहानिशा करणे गरजेचे होते.  या प्रकरणात बँकेने खातरजमा करणे गरजेचे होते. चूक बँकेचीच असल्याचे मत एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केले.