कमी केलेल्या प्राध्यापकांवर अन्यत्र काम शोधण्याची वेळ; गैरव्यवहारांबाबत बोलल्याने संस्थेने कारवाई केल्याचा आरोप

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीने कमी केलेल्या तीनशेहून अधिक प्राध्यापकांना अन्यत्र काम शोधण्याची वेळ आली आहे. कमी केलेल्या प्राध्यापकांपैकी काहींना नोकरी मिळाली असून, काही नोकरी, व्यवसायाच्या शोधात आहेत. त्यातील एका प्राध्यापकाने थेट चहाचे दालन सुरू केले आहे.

सिंहगड संस्था आणि प्राध्यापक, कर्मचाऱ्यांमधील वाद न्यायप्रविष्ट आहे. वेतन थकल्याने प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी संप केला होता. या संपाने संस्थेतील गैरव्यवहार उघड झाला. त्यानंतर संस्थेने प्राध्यापकांना कमी करण्याचे, बदली करण्याचे धोरण अवलंबले. त्यात करार तत्त्वावरील काही प्राध्यापकांना कमी करण्यात आले, काहींच्या बदल्या करण्यात आल्या. संस्थेतील जवळपास तीनशे प्राध्यापकांना कमी करण्यात आले आहे. त्यातील काही प्राध्यापकांनी अन्यत्र नोकरी शोधली, तर काही प्राध्यापक नोकरीच्या शोधात आहेत. त्यातीलच एक असलेल्या महेश तनपुरे यांनी नोकरी गेली म्हणून हार न मानता, पुन्हा नोकरी करण्याऐवजी व्यवसाय करण्याचा निर्णय घेत थेट चहाचे दालन सुरू केले. १५ ऑगस्टपासून त्यांचे नऱ्हे येथे हे दालन खुले झाले.

‘सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात एक वर्ष प्राध्यापक म्हणून काम केले. मात्र, वेतन न मिळाल्याबाबत आवाज उठवल्याने संस्थेने अनेक प्राध्यापकांना काढून टाकले. त्यात कायम प्राध्यापकांसह करार तत्त्वावरील प्राध्यापकांचाही समावेश होता. काढलेल्या प्राध्यापकांमध्ये मीही होतो. संस्थेच्या गैरव्यवहारांबाबत बोलल्याने माझ्यावर बदनामीचा खटलाही संस्थेने भरला. त्याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे,’ असे तनपुरे यांनी सांगितले.

‘नोकरी गेली म्हणून खचून न जाता व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. प्राध्यापक म्हणून काम करताना अभ्यास करत होतो, तसाच अभ्यास व्यवसायात उतरतानाही केला. व्यवसायासाठी अनेक पर्याय होते. मात्र, चहा ही प्रत्येकाची दैनंदिन गरज आहे. भारतात चहा हे सर्वात लोकप्रिय पेय आहे. त्यामुळे यातील संधींचा विचार करून चहाचे दालन सुरू केले, असे तनपुरे यांनी सांगितले.

प्राध्यापक म्हणून काम केल्यावर चहाचा व्यवसाय कसा करणार, असा विचार केला नाही. नोकरी गेली म्हणून खचून न जाता या व्यावसायात उतरलो. या व्यवसायात उतरण्याची अजिबात लाज वाटली नाही. जे करायचे, ते कष्टानेच आणि प्रामाणिकपणे करायचे हा विचार होता. त्यामुळे च हा व्यावसाय सुरू केला –   महेश तनपुरे