कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिवांची माहिती

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) चालू शैक्षणिक वर्षांत ८६ हजार २६४ उमेदवारांनी प्रवेश घेतले असून, हे प्रमाण गतवर्षीपेक्षा सुमारे सहा टक्क्य़ांनी अधिक आहे. प्रशिक्षणाचा अल्प कालावधी, कमी प्रशिक्षण शुल्क आणि रोजगाराची हमी, ही या व्यवसाय प्रशिक्षणाची वैशिष्टय़ असल्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती माहिती कौशल्य विकास व उद्योजगता विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी दिली.

कपूर यांनी सांगितले, की राज्यात उद्योग क्षेत्रातील मनुष्यबळाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात किमान एक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार ३५९ तालुक्यांत ४१७ शासकीय आयटीआय कार्यरत आहेत. त्यांची प्रवेश क्षमता ९३ हजार ६३३ आहे. त्याचप्रमाणे राज्यात ४५४ खासगी आयटीआय कार्यरत असून, त्यांची प्रवेश क्षमता ३९ हजार ७६० आहे. एकूण एक लाख ३३ हजार ३९३ जागांसाठी ऑगस्ट २०१६ प्रवेशसत्रामध्ये तीन लाख २३ हजार ६२६ उमेदवारांनी अर्ज केले. गेल्या वर्षांच्या तुलनेत १४ टक्के अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये एक वर्ष ते दोन वर्ष कालावधीचे विविध ७९ प्रकारचे व्यवसायांचे प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. उद्योगधंद्यातील तज्ज्ञांनी हे व्यवसाय अभ्यासक्रम तयार करतांना कारखान्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कौशल्यांचा विचार केला आहे. इयत्ता दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण उमेदवारांच्या कलेप्रमाणे निवडीसाठी अधिक पर्याय उपलब्ध आहेत. अवजड यंत्र सामग्रीवर आधारित अभियांत्रिकी स्वरूपाच्या अभ्याक्रमासाठी या वर्षी देखील अधिक पंसती आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांना बगल देत महिला उमेदवार देखील अभियांत्रिकी स्वरूपाच्या अभ्यासक्रमांना पसंती देत आहेत. सद्य:स्थितीत १० हजार ८१० औद्योगिक आस्थापनांमध्ये ९४ हजार ८९० जागा शिकाऊ उमेदवारांसाठी उपलब्ध आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांपेक्षा नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे.

काही अभ्यासक्रमांना बारावीची समकक्षता

आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गात थेट प्रवेश दिला जातो. आयटीआयमधील काही विशिष्ट अभ्यासक्रमांना इयत्ता बारावीची समकक्षता देण्यात येणार आहे. रोजगार व स्वयंरोजगारावर आधारित कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत विविध प्रशिक्षणाबाबत www.mssds.in<http://www.mssds.in/> या संकेतस्थळावर सविस्तर माहिती मिळेल, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक सी.ए. निनाळे यांनी दिली.