मुंबईत काहिली; इतरत्र अंशत: ढगाळ स्थिती; तरी पुन्हा थंडी अवतरण्याचा अंदाज

पुणे, मुंबई : संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात राज्याने पहिल्यांदाच तिन्ही ऋतूंचा अनुभव घेतला असताना तापमानाचे हेलकावे श्निवारी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाले. मुंबईत उन्हाचा चटका तीव्र झाला. सकाळी दहानंतर दुपारी बारा वाजल्याचा भास निर्माण करणारी, तर दुपारी चक्क मे महिन्याची आठवण करून देणारी काहिली मुंबईकरांनी अनुभवली.

सध्या राज्यात काही भागांत दुपारनंतर अंशत: ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. पावसाची शक्यता नसली, तरी मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील किमान तापमानात काही प्रमाणात घट होणार असल्याने काही दिवस पुन्हा थंडी अवतरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबई हवामान विभागाच्या कुलाबा केंद्राने कमाल ३१ अंश सेल्सिअस तर किमान २२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली. सांताक्रूझ केंद्राने कमाल ३४.७ अंश सेल्सिअस तर किमान २०.८ अंश सेल्सिअस तापमानाची शनिवारी केली. कोरडी हवा आणि वारे उष्ण असल्याने तापमानात वाढ झाली आहे. हे वारे हवेच्या खालच्या थरातून वाहत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. रविवारीही तापमान चढेच असेल.

शनिवारी नाशिक येथे राज्यातील नीचांकी १४.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील एक-दोन दिवसांत महाराष्ट्रासह संपूर्ण मध्य भारतातील किमान तापमानात २ ते ४ अंशांनी घट होणार आहे. परिणामी काही दिवस तरी थंडी पुन्हा अवतरणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यस्थिती…

गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत शनिवारी राज्यात काही भागातील किमान तापमानात किंचित घट नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे रात्री हलका गारवा निर्माण झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह कोकणातील किमान तापमान सरासरीच्या आसपास आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत ते सरासरीपेक्षा कमी असल्याने या ठिकाणी काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे.

तापभान…

आग्नेय अरबी समुद्रावर असलेला चक्रीय चक्रवात सध्या अरबी समुद्र, कर्नाटक-गोवा किनारपट्टीवर आहे. दक्षिणेकडून उष्ण वारे वाहत आहेत. त्याचवेळी उत्तरेकडून काही प्रमाणात थंड वारे येत आहेत. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी दुपारनंतर आकाश अंशत: ढगाळ होत आहे. मुंबई आणि उपनगरांत शनिवारी कमाल तापमानात मोठी वाढ नसली, तरी उन्हाचा चटका मात्र तीव्रपणे जाणवला.

अमेरिकेत…

अमेरिकेतील टेक्सास हा एरवी उष्ण असलेला भाग. तेथे नेहमी उष्णतेच्या लाटा येतात पण सध्या तिथे बर्फाचे जाड थर आहेत. गेल्या ३० वर्षांत तेथील तपमान इतके कमी झाले नव्हते. काही भागात उणे १८ अंश सेल्सियस तपमान आहे. अमेरिकी हवामान सेवेच्या मते आक्र्टिक विस्फोटामुळे हे घडून आले आहे.  हा परिणाम अमेरिका-कॅनडा सीमेवर निर्माण झाला त्यामुळे हिमवादळे होऊन तपमान खाली आले. डलासमध्ये सोमवारी तपमान उणे १० अंश सेल्सियस होते. ते याच काळात एरवी १५ अंश सेल्सियस असते.

युरोपातही सारखीच स्थिती…

आक्र्टिकमधील हवा प्रवाह पूर्वेकडे जात असल्याने युरोप खंडात अचानक तपमान वाढत आहे. काही प्रमाणात थंड वारे असतानाही ही तापमानवाढ दिसत आहे. एकाच वेळी धुके व जास्त तापमान असा विचित्र परिणाम युरोपातील काही देशात दिसत आहे. ‘बीबीसी’च्या हवामानतज्ज्ञ हेलन विलेटस यांनी सांगितले की, येत्या काही दिवसात आग्नेय युरोपमध्ये तपमान २० अंश सेल्सियसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.