News Flash

चाकण, पिंपरीतील लघुउद्योगांनाही झळा

उत्पादन घटल्याने हजारो कंत्राटी कामगार बेरोजगार

|| बाळासाहेब जवळकर

उत्पादन घटल्याने हजारो कंत्राटी कामगार बेरोजगार

चाकणसह पिंपरी-चिंचवड, रांजणगाव या औद्योगिक पट्टय़ात मागणी कमी झाल्याने कंपन्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. द्यायला कामच नसल्याने कंपन्यांनी कामगार कपातीचे धोरण अवलंबले आहे. मोठय़ा उद्योगांवर अवलंबून असणाऱ्या मध्यम उद्योगांनाही मंदीची झळ बसली असून लघुउद्योजकांचे कंबरडेच मोडले आहे. या परिस्थितीचा फटका रोजंदारीवरील हजारो कामगारांना बसत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात १९६० च्या सुमारास एमआयडीसीची स्थापना झाली, तर चाकण-रांजणगाव परिसरात १९९५ नंतर टप्प्याटप्प्याने औद्योगिक वसाहत वसू लागली. पिंपरी-चिंचवडमध्ये लहानमोठे मिळून १५ हजार उद्योग सद्य:स्थितीत आहेत. तर चाकण-रांजणगावमध्ये हा आकडा सात हजारांच्या घरात आहे. लाखो कामगारांचे भवितव्य या औद्योगिक पट्टय़ावर अवलंबून आहे. वाहन विक्रीतील घसरण कायम राहिल्याने वाहन उत्पादक, वितरक, सुटय़ा भागाचे विक्रेते असे सर्वच चिंतेत आहेत. या वातावरणाचा फटका पिंपरी-चिंचवड शहरातील विविध उद्योगांना बसत आहे. केवळ वाहन उद्योगच नाही, तर इतरही उद्योगांवर या संकटाचे कमी-अधिक प्रमाणात सावट आहे.

मोठय़ा कंपन्यांनी काही दिवसांसाठी काम बंद (ब्लॉक क्लोजर) केले की त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या मध्यम आणि लघुउद्योगांना काम बंद ठेवावे लागते. काम कमी झाल्याने कंपन्यांनी कामगार कपातीचे धोरण सुरू केले आहे.  कंत्राटी तसेच शिकाऊ कामगार, जेमतेम १० हजारांपर्यंत पगार असलेला कामगार आणि ज्याचे पोट हातावर आहे, अशा कामगारांना या वातावरणाचा फटका बसत आहे.

मंदीचे वातावरण निर्माण झाल्यापासून अनेकांनी मूळ गावचा रस्ता धरला आहे. भाडय़ाने दिल्या जाणाऱ्या खोल्या रिकाम्या होऊ लागल्याचे चित्र आहे. जागांनाही सध्या मागणी कमी आहे. मात्र, उत्पादन सुरू झाल्यानंतर ही परिस्थिती बदलेल, असा विश्वास उद्योजकांकडून व्यक्त केला जात आहे. तर मंदीमुळे निर्माण झालेली परिस्थिती अशीच कायम राहिल्यास अराजक निर्माण होईल. आतापासून खबरदारीच्या उपाययोजना, धाडसी सुधारणा केल्या पाहिजेत, अशा भावना विविध उद्योगांमधील कामगार नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. मंदीचा बाऊ करून ठरावीक कंपन्या त्यांचे हेतू साध्य तर करत नाही ना, अशी शंकाही काहींनी व्यक्त केली.

‘ब्लॉक क्लोजर’मुळे चिंतेचे वातावरण

उद्योगनगरीतील शेकडो उद्योग टाटा मोटर्सवर अवलंबून आहेत. त्यामुळे कंपनीतील घडामोडींचा परिणाम शहरातील उद्योग क्षेत्रावर लगेच होतो. टाटा मोटर्समध्ये वाहनांची विक्री कमी झाली आहे. यापूर्वी तयार झालेली वाहने तशीच आहेत. नव्या गाडय़ा बाजारात आणणे तूर्त लांबणीवर टाकण्यात आले आहे. कंपनीत ‘ब्लॉक क्लोजर’चे पर्व सुरूच आहे. जानेवारीपासून आतापर्यंत २४ दिवस ब्लॉक क्लोजर घेण्यात आला. त्यातील १४ दिवस जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील आहेत. सध्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ातही ब्लॉक क्लोजर आहे. कंपनीने मात्र उत्सवी हंगाम सुरू होताच सध्याची आव्हानात्मक परिस्थिती सुधारेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

वाहन उद्योगातील सध्याच्या परिस्थितीमुळे उद्योगनगरीतील मोठय़ा कंपन्यांनी स्थलांतराचा मार्ग पत्करला आहे. लघुउद्योजकांचे कंबरडे मोडले आहे. जानेवारीपासून काम कमी होत चालले आहे. सध्याच्या स्थितीत सुमारे ३० टक्के काम कमी झाले आहे. पिंपरी-चिंचवड पट्टय़ात लघू आणि मध्यम स्वरूपाच्या १२ हजार कंपन्या आहेत. त्यावर पाच लाख कामगार अवलंबून आहेत. या सर्वाना मंदीची झळ बसते आहे.     – संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना

सध्याची परिस्थिती वाईट आहे. उद्योगांना ३० ते ५० टक्के फटका बसतो आहे. त्यामागे निश्चलनीकरण, वस्तू आणि सेवा कर ही प्रमुख कारणे आहेत. माझ्याकडे १३०० कामगार होते. गेल्या सहा महिन्यांत ही संख्या ५०० झाली आहे. सरकारच्या पातळीवर योग्य निर्णय वेळेवर होत नाहीत, हे मोठे दुखणे आहे.   – आबा ताकवणे, उद्योजक

चाकण, रांजणगाव, पिंपरी-चिंचवड या औद्योगिक पट्टय़ात मंदीचा मोठा फटका बसला आहे. मंदीची झळ टाटा मोटर्स, फोक्स वॅगन, महिंद्रा, जनरल मोटर्स अशा मोठय़ा कंपन्यांना बसली आहे. कंपन्यांमध्ये मोजके कामगार ठेवून इतरांना काढून टाकण्यात येत आहे. काही ठिकाणी मंदीचा बाऊ केला जातो. कामगारांना काढून टाकण्यासाठी हुकमी हत्यार म्हणून मंदीच्या कारणांचा वापर केला जाऊ शकतो.   – दिलीप पवार, श्रमिक एकता महासंघ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 12:53 am

Web Title: small industries in pune mpg 94
Next Stories
1 पुण्यातील दोन मंडळांच्या गणेश मूर्तीची संभाजी भिडे गुरुजींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना
2 मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या दोघांना अटक
3 पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर शेण नव्हे चिखल अनावधानाने फेकला
Just Now!
X