04 March 2021

News Flash

ओला कचरा खाणारी बांबूची टोपली

भाजीपाल्याची देठं हा ओला कचरा म्हणजे प्रत्येक घरामध्ये एक समस्याच झाली आहे.

घरातील ओला कचरा घरातच जिरवण्यासाठी नावीन्यपूर्ण बांबूची टोपली करण्यात आली आहे. या टोपलीत जीवाणूंचे विरजण घातलेले असल्यामुळे या टोपलीत लगेच कचरा टाकायला सुरुवात करता येते. त्याची दरुगधी तर येत नाहीच, पण दोन महिन्यांनी खत मिळायलाही सुरुवात होते.

भाजीपाल्याची देठं हा ओला कचरा म्हणजे प्रत्येक घरामध्ये एक समस्याच झाली आहे. पर्यावरणविषयक जागृती घडविण्याच्या उद्देशातून महापालिकेने ओला कचरा आणि सुका कचरा याचे वर्गीकरण करून तो वेगळा ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार शहरातील काही नगरसेवकांनी नागरिकांना ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी बकेटचे वाटप केले होते. महापालिकेच्या घंटागाडय़ा यादेखील केवळ सुका कचरा संकलित करतात. मग, ओल्या कचऱ्याचे करायचे काय हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. ओला कचरा खाणारी बांबूची टोपली अशी नावीन्यपूर्ण निर्मिती करून मयूर भावे आणि सुजाता भावे यांनी या प्रश्नाची उकल केली आहे.

नावीन्यपूर्ण बांबूची टोपली ही कचरा खाण्यासाठी सज्ज असते. या टोपलीत जीवाणूंचे विरजण घातलेले असते. त्यामुळे या टोपलीत लगेचच कचरा टाकायला सुरुवात करू शकतो. एका टोपलीमध्ये चार ते पाच जणांच्या कुटुंबाचा कचरा आरामात जिरतो. गंमत म्हणजे ही टोपली कधीच भरून वाहत नाही. टोपलीला भरपूर भोकं असल्याने अजिबात दरुगधी येत नाही. ओला कचरा आपोआप जिरला जातो आणि या टोपलीमध्ये असलेल्या विरजणामुळे त्याचे रुपांतर खतामध्ये होते. दोन महिन्यांनी खत मिळायला सुरुवात होते.

या टोपलीमध्ये स्वयंपाकघरातील सर्व कापलेल्या भाज्यांचे देठ, फळांची साले, ताटातील खरकटे, चहाचा चोथा, निर्माल्याची फुले, अंडय़ाची टरफले आणि वाळलेली पानेसुद्धा टाकू शकतो. फक्त सुरुवातीला उरलेले अन्नमांसाचे तुकडे आणि हाडं टाकू नयेत. सध्याच्या प्लॅस्टिक बंदीच्या काळात बांबूची टोपली पर्यावरणपूरक आहे, असे मयूर भावे यांनी सांगितले. ते सिमेन्स कंपनीमध्ये सॉफ्टवेअर मॅनेजर आहेत. घराच्या गच्चीवर बाग करण्यासाठी आम्हाला ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित होणाऱ्या प्रिया भिडे यांच्या ‘हिरवा कोपरा’ सदरवाचनाचा फायदा झाला. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आम्ही गच्चीवर बाग फुलविली आहे. त्यानंतरचा टप्पा म्हणून ओला कचरा हा घरातच जिरविण्याच्या उद्देशातून बांबूची टोपली विकसित केली. मंडईतील बुरुड आळीतून टोपल्या विकत घेऊन मग ओल्या कचऱ्याचे खतामध्ये रुपांतर करणारी टोपली निर्माण केली जाते. या टोपल्या नाममात्र दरामध्ये उपलब्ध करून दिल्या जातात, असेही  भावे यांनी सांगितले.  ज्यांनी आमच्याकडून या टोपल्या घेतल्या आहेत त्यांनीच याचा प्रचार केला. त्यामुळे आम्हाला बाहेरगावाहून दूरध्वनी आले. त्या सर्वानाच टोपल्या देणे शक्य होत नाही. त्यांनी घरच्या घरी टोपली तयार करावी. १२ इंच उंच आणि तेवढय़ाच व्यासाची बांबूची टोपली घेऊन त्यामध्ये साधारण पाच ते सहा इंच जाडीच्या नारळाच्या शेंडय़ांचा सर्व बाजूंनी थर द्यावा. मग त्यामध्ये थोडे कोकोपीट आणि जीवाणू किंवा गांडुळांचे विरजण घालणे आवश्यक आहे. पण, ते नाही मिळाले तरी त्यामध्ये घरातील ओला कचरा टाकण्यास सुरुवात करा. टोपलीला भरपूर भोकं असल्याने दरुगधी नक्की येणार नाही. काही दिवसांनी खालचा कचरा बाकीच्या कुंडय़ांना किंवा एखाद्या मोठय़ा झाडाला घालू शकतो. सहज शक्य झाल्यास त्यामध्ये गांडुळे, शेण, गोमूत्र किंवा शेणखत घालावे. उत्तम दर्जाचे खत मिळाले नाही तरी कमीत कमी आपला कचरा घराबाहेर जाणार नाही हे नक्की. काही चुकले असे वाटले तर हा सर्व जैविक कचरा एखाद्या झाडाला किंवा टेकडीवर टाकावा, असा सल्ला भावे यांनी दिला आहे. या प्रयोगाबद्दल ज्यांना अधिक माहिती हवी असेल त्यांना मयूर भावे यांच्याशी ९८८१९७८४१२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 5:05 am

Web Title: social work in pune 4
Next Stories
1 अभिजात नृत्यशैलीचा आविष्कार
2 वेश्याव्यवसायप्रकरणी इंदापुरातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरुद्ध गुन्हा
3 प्रभाग क्र. २२ च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या पूजा कोद्रे विजयी
Just Now!
X