14 December 2017

News Flash

विद्यार्थ्यांना रोज शंभर नमस्कारांची सक्ती!

नम्रपणासाठी अजब सोलापुरी उतारा

प्रतिनिधी, पुणे | Updated: June 20, 2017 2:40 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

नम्रपणासाठी अजब सोलापुरी उतारा

लहान मुलांना जडण-घडणीच्या वयातच मोठय़ांप्रति आदर निर्माण व्हावा, यासाठी उपदेश किंवा जागृतीऐवजी सक्तीचा नवा उतारा सोलापूर जिल्हा शिक्षण विभागाने शोधून काढला आहे. ‘विद्यार्थ्यांनी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कमीतकमी शंभर वेळा नमस्कार केला पाहिजे,’ असा फतवा काढून सहस्र नमस्कारांचा चमत्कार त्यांच्याकडून इतरांनी पाहावा यासाठी नव्या अभिनव अभियानाची सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी नम्रपणा आणण्याचा ‘सहस्र नमस्कारी’ सोपस्कार जिल्ह्य़ामध्ये कुतुहलाचा विषय बनला आहे.

भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी फाशी देण्यात आली, असे सोलापूर जिल्ह्य़ाच्या शिक्षण विभागाने काढलेले वादग्रस्त पत्रक काही दिवसांपूर्वी बरेच गाजले होते. आता या फतव्यामुळे नव्या वादाची सुरुवात झाली आहे. सोलापूर येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत शिक्षण विभागासाठी पंचसूत्री निश्चित करण्यात आली आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांची गळती कमी करणे, शाळांना आयएसओ दर्जा मिळवून देणे, गुणवत्ता वाढ अशा काही उद्दिष्टांच्या जोडीला विद्यार्थ्यांना नम्र करण्याचाही विडा शिक्षण विभागाने उचलला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या इतिवृत्तात हे अभियान राबवण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पहिल्याच दिवशी शाळांना याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत.

नमस्कार कसे करावेत?

शिक्षण विभागाच्या शाळा सिद्धी अभियानांतर्गत  अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत घरातील वडीलधाऱ्या व्यक्ती, गावातील थोर व्यक्ती, शाळेतील शिक्षक यांना कमीत कमी शंभर वेळा नमस्कार करायचा आहे. गमतीचा भाग म्हणजे तालुकास्तरावर या अभियानाची अंमलबजावणी करायची आहे. गटशिक्षण अधिकारी यांनी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्यामार्फत हे अभियान राबवायचे आहे.

‘..आपण माझ्या कामावर समाधानी आहात का?’

विद्यार्थ्यांना नम्र करतानाच शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारीही गमतीदार अभियानांमधून सुटलेले नाहीत. ‘मी माझ्या पदावर आणि पगारावर समाधानी आहे, आपण माझ्या कामावर समाधानी आहात का?’ अशी पाटी शिक्षण विभागातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने लावायची आहे. त्यामुळे कामे प्रलंबित राहणार नाहीत असाही शोध सोलापूर जिल्हा परिषदेने लावला आहे.

First Published on June 20, 2017 2:40 am

Web Title: solapur district education department surya namaskar forced to students