चित्रपटाचा वेगळा विषय, कलाकारांनी केलेले वेगळे प्रयोग, प्रसिद्धीची वेगळी पद्धत आणि त्याच्या प्रदर्शनाचे आगळे नियोजन.. अशी अनेक वैशिष्टय़ असलेला ‘टुरिंग टॉकीज’ हा सिनेमा प्रत्यक्षात कसा उभा राहत गेला याची ‘गोष्ट’ च गुरुवारी या चित्रपटाच्या टीमने कथन केली. निमित्त होते या टीमने ‘लोकसत्ता’ च्या पुणे कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीचे!
चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारी व स्वत: निर्माती असलेली तृप्ती भोईर, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे तसेच, कलाकार किशोर कदम, मिलिंद शिंदे, सुबोध भावे, नेहा पेंडसे, चिन्मय संत यांनी गुरुवारी ‘लोकसत्ता’ च्या टीमशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि हा चित्रपट उभा करताना काय-काय करावे लागले, याचा अनुभव सांगितला. टुरिंग टॉकीज म्हणजे तंबूमधील सिनेमागृह चालवणाऱ्या एका जिद्दी तरुणीची ही कहाणी. पूर्वी अनेक सिनेमे अशा टॉकिजमध्ये प्रदर्शित व्हायचे. या टॉकीज फिरत्या असायच्या, त्यामुळे सैनानीबाबा (बुलडाणा), पैठण, पाल, पुसेगाव, जोतिबा अशा गावोगावच्या जत्रांमध्ये फिरावे लागायचे. त्यामुळे या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी टीमला अनेक जत्रांमध्ये जावे लागले. तिथे आलेले अनुभव त्यांनी ऐकवले.
हा चित्रपट हे एक स्वप्नच असल्याने तृप्तीने भूमिकेची गरज म्हणून स्वत:चे लांब केस कापले आणि झिरो कट केला. त्यासाठी घरची व मित्र-मैत्रिणींची बोलणी खाल्ली, तर किशोरची भूमिका लिहिली गेली नव्हती. ती त्या त्या चित्रीकरणाच्या वेळी विकसित होत गेली.. अशा वैशिष्टय़ांबरोबरच आणखी एक वेगळी बाब म्हणजे हा सिनेमा येत्या १९ तारखेला मुंबई, पुणे व गोव्यात तंबूमध्येच प्रदर्शित केला जाणार आहे. पुण्यात ही जागा असेल- बाबा भिडे पुलाजवळील नदीपात्रातील जागा, तर मुंबईत वरळीतलं जांभुळी मैदान.

ए.आर. रेहमान घेणार तंबूची जबाबदारी
भारतात १९८५ साली तंबूंमधील चित्रपटगृहांची संख्या दोन हजार होती. आता ती केवळ ३२ इतकीच आहे. ती चालवणाऱ्या लोकांनी त्यात पूर्णपणे झोकून दिले आहे. या पाश्र्वभूमीवर प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान हे एका तंबूची संपूर्ण जबाबदारी घेणार आहेत, असे तृप्तीने सांगितले.