‘‘केंद्र शासनाची चुकीची वाटणारी काही धोरणे, साखरेच्या भावातील चढ-उतार याचा सहकार क्षेत्रावर परिणाम होत आहे. मात्र, चांगल्याप्रकारे चालणाऱ्या संस्थांच्या पाठीशी राज्यशासन नेहमीच उभे आहे,’’ असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी सांगितले.
‘नरूभाऊ लिमये स्मृती आर्यभूषण पुरस्कार’ प्रदान सोहळ्यामध्ये चव्हाण बोलत होते. महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयातर्फे गेली सोळा वर्षे सहकार क्षेत्रातील आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना ‘नरूभाऊ लिमये स्मृती आर्यभूषण पुरस्कार’ दिला जातो. यावर्षी अहमदनगर जिल्ह्य़ातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते अप्पासाहेब राजळे यांना हा पुरस्कार देण्यात आला. मानचिन्ह आणि २१ हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पत्रकारितेसाठी देण्यात येणारा पुरस्कार लोकमत समूहाचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांना देण्यात आला असून मानचिन्ह आणि ११ हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार वंदना चव्हाण, महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाचे संचालक अंकुश काकडे, अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष अरविंद चव्हाण उपस्थित होते.
या वेळी चव्हाण म्हणाले, ‘‘केंद्र शासनाच्या धोरणांचा सहकार क्षेत्रावर परिणाम होत आहे. आपल्याला ही धोरणे चुकीची वाटत असली, तरी शासनाची त्यामागे भूमिका असेल. सध्या सहकार चळवळीसमोर अनेक आव्हाने आहेत. सहकार चळवळ सुधारली पाहिजे. मात्र, त्याचबरोबर त्याला शिस्तीचीही गरज आहे. त्यासाठी स्पर्धा निर्माण होण्याची गरज आहे. चांगल्या चालणाऱ्या संस्थांना शासन सहकार्य करेल.’’
‘‘पत्रकारितेच्या क्षेत्रातही आमूलाग्र बदल होत आहेत. भविष्यात पत्रकारितेचे माध्यम बदलेल, पण पत्रकार राहणारच. मात्र, त्याचवेळी विश्वासार्हता राखण्याचे आव्हानही आहे. समाजातील प्रत्येक घटक आपापली बाजू बरोबरच असे सांगत असताना, खरे काय आहे हे लोकांना सांगण्याचे काम पत्रकारांचे आहे,’’ असेही ते म्हणाले.
या वेळी राजळे म्हणाले, ‘‘चांगल्या उद्योगासाठी पारदर्शी व्यवहार आवश्यक आहे, हे सहकार क्षेत्राने लक्षात घेणे आवश्यक आहे. सहकार क्षेत्राचा महाराष्ट्राच्या घडणीत मोठा वाटा आहे. मात्र, आज सहकार क्षेत्र अडचणीत आले आहे. साखर कारखान्यांसमोर अनेक आव्हाने आहेत. महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक प्रगतीबरोबरच शिक्षण व्यवस्थाही सहकार क्षेत्राने टिकवली आहे, त्याला शासनाने बळ देणे आवश्यक आहे.’’
या वेळी पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यातर्फे मुख्यमंत्री निधीसाठी ३५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.