बेटिंगचे अ‍ॅप बनविणाऱ्या एकांक्ष राजेंद्रकुमार जैन (वय ३३, रा. रक्षकनगर, गोल्ड सोसायटी, खराडी) याने २० बुकींना त्याने तयार केलेले बेटॉन हे अ‍ॅप विकल्याचे समोर आले आहे. त्याच्या संपर्कात असलेल्या तीन बुकींनी या अ‍ॅपच्या माध्यमातून एक कोटी चोवीस लाख रुपयांचा नफा कमविल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे जैन याच्या कोठडीत न्यायालयाने १३ ऑक्टोबपर्यंत वाढ केली.
क्रिकेट, टेनिस, सॉकर व इतर खेळांवर बेटिंगसाठी सट्टेबाजांना लागणारे अ‍ॅप बनवून बुकींना विक्री केल्याप्रकरणी जैन याला गुन्हे शाखेच्या मालमत्ताविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याने हे अ‍ॅप बुकींना पंचवीस लाख रुपयांना विकले होते. त्याच्याकडे तपास केला असता संजय ठक्कर, कुशाल रामंबिया, परवेझ पंजवानी या तिघांना हे अ‍ॅप विकले आहे. या तिघांनी अ‍ॅपवरून बेटिंग करून एक कोटी २४ लाख १६ हजार रुपयांचा नफा कमविल्याचे समोर आले आहे. या तिघांबरोबरच इतर वीस बुकींसोबत जैन संपर्कात असल्याचे समोर आले आहे. या बेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून देशभर जाळे विणल्याचे समोर आले आहे. या संपर्कात असलेल्यांना अटक करायची आहे. या गुन्ह्य़ाचा तपास व्यापक असून जैनला पोलीस कोठडी वाढून देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली. जैन याला मुंबई पोलिसांनी यापूर्वी ‘आयपीएल सात’मध्ये बेटिंग करण्यासाठी संकेतस्थळ बनविल्याप्रकरणी अटक केली होती. त्यातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा हे अ‍ॅप तयार केल्याचे तपासात समोर आले आहे.