राजस्थान ते उत्तरप्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या वेण्या कापल्याच्या अफवांमुळे दहशतीचे वातावरण पसरले असताना भिवंडीतही अशीच अफवा पसरल्याने चर्चेचा विषय बनला आहे. भिवंडीच्या कासार आळीत राहणाऱ्या नणंद–भावजयीच्या वेण्या मध्यरात्रीच्या सुमाराला अज्ञात व्यक्तीने कापल्याची ही अफवा शहरात वाऱ्यासारखी पसरली. अचानक घडलेल्या या अफवांमुळे परिसरातील महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राजस्थानपासून सुरु झालेल्या वेण्या कापण्याच्या अफवा सुरू झाली. त्यानंतर हरियाणा, दिल्ली आणि उत्तरप्रदेशमध्येही ती पसरली. आत्तापर्यंत १०० हून जास्त अशा घटना घडल्याचा दावा करण्यात येत आहे. हे सर्व सुरु असतानाच भिवंडीमधील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासार आळी येथे राहणाऱ्या एका कुटुंबासोबत देखील अशीच एक घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या कुटुंबातील परीया कुरेशी (२४) आणि महेक कुरेशी (२३) या नणंद-भावजय सोमवारी मध्यरात्रीच्या सुमाराला झोपलेल्या असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात शिरून वेण्या कापल्याचे सांगितले जात आहे.

सर्वात प्रथम परीया या तरुणीची वेणी कापल्याचे तिच्या लक्षात आले. तिने घरच्यांना या घटनेची माहिती देताच घरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर अर्ध्या तासाने तरुणीची भावजय महेक हिच्याही डोक्यावरील काही केस कापल्याचे आढळून आले. महिलांच्या डोक्यावरील केस कापण्याची घटना घडल्याची अफवा भिवंडी शहरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे पोलिसांनी अशा अफवा पसरवण्यावर कारवाईचे संकेत देत अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त नरेश मेघराजानी यांनी केले आहे.

याप्रकरणी कुरेशी कुटुंबाने निजामपूर पोलीस ठाण्यात धाव घेत वेण्या कापणाऱ्या अज्ञातांविरोधात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परंतु पोलिसांनी ही अफवा असल्याचे सांगत तपास सुरु असल्याचे सांगत आहेत.

[jwplayer qSkEaoqJ]