पादचाऱ्यांच्या सोयीसाठी भुयारी मार्ग न बांधता वाहनचालकांसाठी मार्ग कसा बांधला?

जेधे चौकातील (स्वारगेट परिसर) पादचाऱ्यांचे दोन भुयारी मार्ग प्रस्तावित मेट्रो प्रकल्पामुळे बांधले नाहीत, असा दावा करणाऱ्या महापालिकेची बनवाबनवी पुढे आली आहे. शहरातील मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट- डीपीआर) सन २००७-२००८ मध्ये मान्य करण्यात आला होता. स्वारगेट परिसरात मेट्रो प्रस्तावित आहे, हे गृहीत धरूनच या परिसरात सन २०१२-१३ मध्ये उड्डाण पुलाचे नियोजन करण्यात आले होते. मेट्रोला अडथळा ठरू नये आणि करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होऊ नये, यासाठी भुयारी मार्ग न बांधण्याचा निर्णय घेतल्याचे सांगणाऱ्या महापालिकेने याच परिसरात वाहनचालकांसाठी भुयारी मार्ग कसा बांधला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

स्वारगेट परिसरात सातत्याने होत असलेली वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी या चौकात इंग्रजी वाय आकाराचे उड्डाण पूल आणि पादचाऱ्यांसाठी दोन भुयारी मार्ग बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र भुयारी मार्ग नसल्यामुळे पादचाऱ्यांची त्रेधातिरपीट उडत असून हजारो पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन या परिसरात रस्ता ओलांडावा लागत असल्याची वस्तुस्थिती ‘लोकसत्ता’ने शुक्रवारी मांडली.

उड्डाण  पूल बांधण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला देण्यात आले होते. उड्डाण पुलाच्या मूळ आराखडय़ातही पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग दर्शविण्यात आले होते. मात्र उड्डाण पुलांचे काम अंतिम टप्प्यात आले असताना स्वारगेट येथे मेट्रो प्रकल्पाला मान्यता मिळाली. त्यामुळे पैशांचा अपव्यय होऊ नये, यासाठी स्थायी समितीच्या निदर्शनास ही बाब आणून पादचारी भुयारी मार्ग बांधण्यात आले नाहीत, असा दावा महापलिकेच्या वाहतूक विभागाचे प्रमुख श्रीनिवास बोनाला यांनी केला आहे. मात्र मेट्रोचे कारण पुढे करून महापालिका बनवाबनवी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वारगेट परिसरात उड्डाण पूल प्रस्तावित करताना बीआरटी, मेट्रो यादी अन्य सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचाही विचार करण्यात आला होता. मेट्रोच्या सविस्तर प्रकल्प आराखडय़ाला सन २००७-२००८ मध्ये मान्यता देण्यात आली. तर उड्डाण पुलाचे काम सन २०१२-१३ मध्ये सुरू झाले. प्रस्तावित मेट्रो प्रकल्प लक्षात घेऊनच महामंडळाने कामाचा आराखडा केला होता. त्यामुळे पादचाऱ्यांचे भुयारी मार्ग मेट्रोला अडथळा ठरणार नाहीत, असे नियोजन करण्यात आले होते. पादचाऱ्यांसाठी प्रस्तावित असलेले भुयारी मार्ग मेट्रोसाठी अडचणीचे ठरणार होते तर पालिकेने आयकर भवन ते सारसबाग या दरम्यान वाहनांसाठी भुयारी मार्ग का बांधला, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. सध्याचा वाहनांसाठी असलेल्या भुयारी मार्ग खोल आणि लांबीला मोठा आहे. त्यापेक्षा पादचाऱ्यांचे भुयारी मार्ग हे लहान व कमी लांबीचे होते. मग पादचाऱ्यांसाठीचे भुयारी मार्ग अडथळ्यांचे ठरतील, असे कोणत्या निकषावर ठरविण्यात आले, असाही आक्षेप आहे.

‘महापालिकेचा दावा हस्यास्पद’

मेट्रो प्रकल्पामुळे भुयारी मार्ग बांधण्यात आलेले नाहीत, हा महापालिकेचा दावा हास्यास्पद आणि दिशाभूल करणारा आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन असंवेदनशील आहे. पादचाऱ्यांऐवजी वाहनचालकांनाच महापालिका प्राधान्य देत आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृिष्टकोनातून योग्य त्या उपाययोजना महापालिकेने करणे क्रमप्राप्त आहे, अशी प्रतिक्रिया पादचारी प्रथम संस्थेचे निमंत्रक प्रशांत इनामदार यांनी व्यक्त केली.

पादचारी मार्ग कोठे?

सातारा रस्त्याने कर्मवीर भाऊराव पाटील चौक (व्होल्गा चौक) ते शंकर शेठ रस्त्याकडे जाणारी एक मार्गिका आणि सारसबागेच्या दिशेला उतरणारी एक मार्गिका असा वाय आकाराचा उड्डाण पूल बांधण्यात आला आहे. स्वारगेट बस स्थानक, पीएमपीचे बसथांबे यामुळे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कात्रजच्या दिशेने एक आणि शिवाजी रस्त्याच्या बाजूला एक असे दोन भुयारी मार्ग या परिसरात प्रस्तावित होते.