गुन्हेगारांचा माग काढण्याठी पुणे पोलिसांनी स्पॉटर किट यंत्रणा विकसित केली असून या यंत्रणेद्वारे गंभीर गुन्ह्य़ांचा छडा लावणे शक्य होणार आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या बंदोबस्तासाठीही या यंत्रणेचा वापर करणे शक्य होईल.

पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या हस्ते या यंत्रणेचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. गुन्हे शाखेचे उपायुक्त बच्चन सिंह, विशेष शाखेचे उपायुक्त मितेश घट्टे या वेळी उपस्थित होते. पुणे पोलिसांनी मणिपाल ग्रुप एंटिटिज, मणिपाल टेक्नोलॉजिज, विज्ञा लॅब्स यांच्या सहकार्याने ही यंत्रणा विकसित केली असून बिनतारी संदेश विभागातील पोलीस निरीक्षक घोडेकर, पसाळकर यांनी यंत्रणा विकसित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

गंभीर गुन्हा घडल्यानंतर तातडीने संशयितांचे छायाचित्र या यंत्रणेवर उपलब्ध होईल. गुन्हेगारांची माहिती पोलिसांनी संकलित केली आहे. या माहितीचा वापर करून घटनास्थळावर असलेल्या पोलिसांना घटनास्थळाचे विश्लेषण करणे शक्य होईल. गुन्हा करण्याची पद्धत तसेच संशयितांचे छायाचित्र उपलब्ध झाल्यानंतर तपासाची दिशा ठरविणे शक्य होईल.

स्पॉटर किट तंत्रज्ञान वापरण्यास सुलभ आहे. मोबाइल अ‍ॅप आधारित ही यंत्रणा असून पोलिसांच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आली आहे. टेहळणी, गुन्हेगार तसेच संशयितांचा माग काढण्यासाठी या यंत्रणेचा वापर केला जाणार आहे.

यंत्रणा काय..

लष्कराचे दक्षिण मुख्यालय तसेच हवाई दलाचा तळ पुण्यात आहे. अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्यक्रम शहरात असतात. स्पॉटर किटमध्ये ३६० अंशातून चित्रीकरण करणारे कॅमेरे आहेत. ही यंत्रणा हाताळण्यास सुलभ आहे. त्यामुळे घटनास्थळ तसेच संशयितांचा वावर असणाऱ्या ठिकाणी ही यंत्रणा सहज वापरणे शक्य आहे. शहर विस्तार वाढत असून संशयित, गुन्हेगारांचा माग काढण्यास ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.