आदेश आल्यानंतर प्रवाशांच्या मागणीनुसार गाडय़ा

पिंपरी : राज्यातील इतर जिल्ह्य़ांमध्ये जाणाऱ्या नागरिकांसाठी परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाडय़ा तयार झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने आदेश दिल्यानंतर परिवहन महामंडळाच्या गाडय़ा प्रवासी वाहतुकीसाठी प्रासंगिक करारावर देण्यात येतील. पिंपरी येथील वल्लभनगर आगाराने त्याबाबतची पूर्व तयारी सुरू केली असून जिल्हा प्रशासनाचा तसेच परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाचा आदेश आल्यानंतर प्रवाशांच्या मागणीनुसार त्या मार्गावर गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.

राज्य सरकारने शहरातील कामगार, मजूर आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यांच्याकडून गावी जाण्यासाठी पोलिसांकडून रीतसर परवागी घेतली जात आहे. पाचपेक्षा कमी प्रवासी असलेल्या नागरिकांना त्यांच्या स्वत:च्या वाहनाने गावी जाण्यास परवानगी देण्यात येत आहे. परंतु ज्यांच्याकडे स्वत:चे वाहन नाही अशा नागरिकांना परिवहन महामंडळावर अवलंबून राहावे लागणार आहे. परिवहन महामंडळाला प्रवासी वाहतुकीला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. परंतु पोलिसांकडून परवानगी काढलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी पोहोचविण्यासाठी परिवहन महामंडळाकडून प्रासांगिक करारावर गाडय़ा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रशासनाच्या सूचनेनुसार आरोग्य तसेच स्वच्छते संदर्भात सर्व सूचनांचे पालन करण्यात येणार आहे.

राज्य सरकारकडून परिवहन महामंडळाच्या गाडय़ा आरक्षित करण्यात येणार आहेत. मूळ गावी जाणाऱ्या नागरिकांच्या प्रवासाचे भाडे कोणाकडून वसूल करायचे, याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने वल्लभनगर आगाराला प्रवासी वाहतुकीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना संपर्क करून आदेशानुसार कामावर येण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच नादुरुस्त गाडय़ांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे.

शहरातील कामगार, विद्यार्थी, मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी प्रासांगिक करारावर गाडय़ा देण्यात येणार आहेत. परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाकडून आदेश प्राप्त होताच प्रवासी गाडय़ा मार्गावर सोडण्यात येतील. त्याबाबतची तयारी पूर्ण झाली आहे.

 – पल्लवी पाटील, स्थानक प्रमुख, वल्लभनगर, पिंपरी आगार