रिझव्‍‌र्ह बँकेच्या धोरणानुसार निम्मी कर्जवसुली आणि कर्मचारी कपात झाल्याखेरीज रुपी बँकेचे दुसऱ्या बँकेमध्ये विलीनीकरण करणे अशक्य असल्याची माहिती, रुपीच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर यांनी मंगळवारी दिली.
रुपी बँकेचे एकूण थकीत कर्ज ३७४ कोटी रुपये आहे. त्यापैकी आतापर्यंत ४५ कोटी रुपयांचे कर्ज वसूल झाले असून आणखी ११० कोटी रुपयांचे कर्ज विविध मार्गानी वसूल होण्याची शक्यता आहे, असे सांगून अभ्यंकर म्हणाले, बँकेवरील प्रशासक मंडळ २६ फेब्रुवारी २०१३ रोजी बरखास्त झाले, त्या दिवशी कर्मचाऱ्यांची संख्या ९०२ इतकी होती. सेवानिवृत्ती, राजीनामा दिलेले कर्मचारी आणि सेवानिवृत्ती घेतलेले अशी संख्या कमी होऊन डिसेंबर २०१५ अखेरीस ती ५५३ झाली आहे. बँकेने सप्टेंबरमध्ये दिलेल्या स्वेच्छानिवृत्ती योजनेअंतर्गत २०४ सेवकांना त्यांच्या शिल्लक वैद्यकीय रजा आणि अर्जित रजा रोखीकरणापोटी दहा कोटी रुपये द्यावे लागले. निम्मी कर्जवसुली आणि कर्मचाऱ्यांची संख्या तीनशेपेक्षा कमी झाल्यासच रुपी बँकेचे अन्य बँकेमध्ये विलीनीकरण करणे शक्य आहे. त्या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी काही कठोर पावले ही उचलावीच लागतील.