महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना सायकली देण्याची योजना अखेर मार्गी लागली असून या निविदेला स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली. या योजनेला मोठा विलंब झालेला असल्यामुळे किमान यंदाचे शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वीतरी विद्यार्थ्यांना सायकली मिळणार का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
सायकल वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सायकली देण्याची योजना चालू वर्षांच्या अंदाजपत्रकात प्रस्तावित करण्यात आली होती. या योजनेसाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून तीन हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होईल, असा अंदाज आहे. प्रत्येकी तीनहजार पाचशे वीस रुपये याप्रमाणे योजनेतील सायकलींची खरेदी केली जाणार असली, तरी संबंधित निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास मोठा कालावधी लागल्यामुळे अंदाजपत्रकाचे वर्ष संपत आल्यानंतर या योजनेला मंजुरी मिळाली आहे. या योजनेच्या प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आली होती. ती पूर्ण झाल्यानंतर निविदा मागवण्यात आल्या.
या योजनेला मंजुरी मिळाली असली, तरी प्रत्यक्ष खरेदीची तसेच विद्यार्थ्यांना सायकल वाटपाची प्रक्रिया केव्हा पूर्ण होणार याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे पुढील वर्षी ही योजना कशी राबवावी याचे धोरण तयार करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना वेळेत सायकली देता येतील अशा प्रकारे धोरण आखावे असे ठरल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी सांगितले.