अरबी समुद्रातील चक्रीय स्थिती आणि उत्तर मध्य महाराष्ट्रापासून कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे या आठवडय़ात अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळणार असून, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात सर्वच विभागांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.

राज्यात बुधवारी (१ जुलै) संध्याकाळी साडेपाचपर्यंत पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर, मुंबई, रत्नागिरी, औरंगाबाद, परभणी, अकोल्यात पावसाची नोंद झाली. गेल्या चोवीस तासांत कोकणातील देवगड, मालवण, सावंतवाडी, राजापूर, चिपळूण, मध्य महाराष्ट्रातील शिरूर, महाबळेश्वर, मिरज, जेऊर, गगनबावडा, तासगाव, मराठवाडय़ातील परभणी, पूर्णारेणापूर, पालम, धर्माबाद, विदर्भातील नांदगाव काजी दर्यापूर, नागपूर, चांदूर बाजार, कामठी आदी भागांत मोठय़ा पावसाची नोंद झाली.

अंदाज कुठे

पावसाला अनुकूल स्थितीमुळे मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे विभागातील घाटक्षेत्र, कोकण विभागात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगर या भागात मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. २ जुलैला या भागांसह मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पाऊस होईल. ३ आणि ४ जुलैला कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ५ जुलैलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

पर्जन्यभान..

सध्या नैर्ऋत्य मोसमी वारे देशव्यापी झालेले आहेत. त्यामुळे उत्तरेकडील आणि मध्य भारतातील अनेक राज्यांत पाऊस पडतो आहे. महाराष्ट्रामध्येही पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्यांची स्थिती असल्याने कोकणात पाऊस होणार आहे. मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्याचा परिणाम म्हणून या भागासह मराठवाडा आणि विदर्भातही पावसासाठी अनुकूल स्थिती आहे. राज्यात पावसाचा जोर कमी असला, तरी बहुतांश ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. घाटमाथ्यावर चांगला पाऊस होत असल्याचे चित्र आहे.