संभाजी उद्यानात महापालिकेने केलेल्या बांधकामांना राष्ट्रीय हरित लवादाने दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली असून न्यायालयाने उद्यानाताली पाण्याच्या टाकीच्या बांधकामाला परवानगी दिली आहे. उद्यानात पाण्याच्या टाकीव्यतिरिक्त अन्य बांधकाम करता येणार नाही असाही निर्णय देण्यात आला आहे.
महापालिकेच्या बांधकाम नियमावलीत ज्या तरतुदी आहेत त्यांचे उल्लंघन करून पालिकेतर्फे संभाजी उद्यानात बांधकाम केले जात असल्याबद्दल रवींद्र गोरे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली होती. या बांधकामामुळे उद्यानाचे क्षेत्र कमी होत आहे अशी मुख्य तक्रार होती.
या तक्रारीवर झालेल्या सुनावणीत हरित लवादाने बांधकाम थांबवण्याचा आदेश महापालिकेला दिला होता. या आदेशाच्या विरोधात महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने हरित लवादाचा उद्यानात कोणतेही बांधकाम करू नये हा आदेश कायम ठेवला. या बांधकामात पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असल्याचे पालिकेकडून न्यायालयाला सांगण्यात आले. त्याबाबत न्यायालयाने टाकीव्यतिरिक्त अन्य बांधकाम करता येणार नाही असा निर्णय दिला आहे.