उत्तरेकडील काही राज्यांत थंडीची लाट असल्याने राज्यात हलका गारवा निर्माण झाला आहे. मात्र, एक-दोन दिवसांत रात्रीच्या किमान तापमानात पुन्हा काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

नोव्हेंबरचे बहुतांश दिवस थंडीविना गेले. त्यानंतर डिसेंबरमध्ये सुरुवातीचे काही दिवस गारवा वाढला होता. मात्र, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तापमानात वाढ होऊन थंडी गायब झाली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील ढगाळ स्थिती दूर होऊन कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत राज्यात सर्वच ठिकाणी रात्रीच्या किमान तापमानात काही प्रमाणात घट नोंदविली जात आहे. त्यामुळे हलकी थंडी जाणवते आहे.

सद्य:स्थिती..

शनिवारी विदर्भातील गोंदिया येथे राज्यातील नीचांकी ८.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. या विभागात इतर ठिकाणी १३ ते १५ अंशांवर किमान तापमान आहे. मराठवाडय़ात १३ ते १७ अंशांवर किमान तापमान आहे. कोकण विभागातील किमान तापमान सरासरीच्या पुढे आहे. मध्य महाराष्ट्रात गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत किमान तापमानात घट झाली आहे.

अंदाज काय? हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार एक ते दोन दिवस संपूर्ण राज्यातील किमान तापमानात १ ते २ अंशांनी घट होणार आहे. मात्र, त्यानंतर त्यात २ ते ३ अंशांनी वाढ होणार असल्याने गारवा पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात सध्या चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. त्याचा परिणाम पुढल्या काही दिवसांत थंडीवर होऊ शकतो. पुढील आठवडय़ातही त्यामुळे ढगाळ वातावरण किंचित पाऊस आणि धुके असे एकत्रित चित्र दिसू शकते.