औंध जिल्हा रुग्णालयातील ‘मेट्रो ब्लड बँक’ सुरू होण्यासाठी गेल्या ७-८ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आणखी  ३ ते ४ महिने वाट पाहावी लागणार असल्याचे चिन्ह आहे. या रक्तपेढीसाठी लागणारी सर्व अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आली असून सध्या रक्तपेढीला अन्न व औषध प्रशासनाकडून परवानगी मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 परवान्याची ही प्रक्रिया पुढील वर्षांच्या सुरुवातीला पूर्ण होऊ शकणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी दिली. दर वर्षी रक्त आणि रक्तघटकांच्या एक लाख पिशव्यांचा पुरवठा करण्याची क्षमता या रक्तपेढीत असणार आहे. त्यामुळे शहरातील इतर रक्तपेढय़ा, रुग्णालये आणि पुण्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठीही ती उपयोगी पडणार आहे. अॅनिमियासारख्या आजारांमध्ये लाल रक्तपेशींचा, डेंग्यूसारख्या आजारांमध्ये प्लेटलेट्सचा तसेच भाजण्यावर प्लाझमा रक्तघटकाचा पुरवठा रुग्णांना करावा लागत असल्यामुळे वेगळ्या रक्तघटकांची उपलब्धता महत्त्वाची ठरते.
जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीचे प्रमुख डॉ. विजयकुमार पोवार यांनी दिलेल्या माहितीनुसार मेट्रो रक्तपेढीत रक्ताचे घटक वेगळे करण्यासाठी ‘रेफ्रिजरेटेड सेंट्रिफ्यूज’ आणि ‘प्लाझमा एक्स्प्रेसर’ तसेच वेगळ्या केलेल्या प्लेटलेट या रक्तघटकाच्या साठवणुकीदरम्यान त्याची सतत हालचाल होत राहावी यासाठी ‘प्लेटलेट एजिटेटर’ या उपकरणांचा समावेश आहे. रक्त व रक्तघटकांच्या साठवणुकीसाठी – ४० डिग्री सेल्सियस आणि २ ते ६ डिग्री सेल्सियस अशा वेगळ्या क्षमतांच्या शीतयंत्रणांची सोयही येथे उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.