रसभरीत फळे चाखण्याचा यंदाचा हंगाम  शेवटच्या टप्प्यात

लालचुटुक, रसाळ आणि सर्वानाच आकर्षित करणाऱ्या स्ट्रॉबेरीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. अडीच महिने चाललेला स्ट्रॉबेरीचा हंगाम या आठवडय़ाभरात संपेल. दरवर्षीपेक्षा स्ट्रॉबेरीची आवक आणि उचल यात अद्याप गती नसली तरी उन्हाळा वाढल्यामुळे फळे खराब होत असून चांगली मागणी नसल्यामुळे भावातही तीस ते चाळीस टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारामध्ये त्यांची विक्री पुढील दोन आठवडय़ात जोमात होणार असून ग्राहकांना ही फळे स्वस्तात चाखण्याची संधी आहे.

यंदा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू झाला. महाबळेश्वर, वाई, पाचगणी भागातून स्ट्रॉबेरीची आवक होते.   आणखी आठवडाभर स्ट्रॉबेरी बाजारात पाहायला मिळेल. त्यानंतर आवक हळूहळू कमी होईल. वाढलेल्या उन्हाचा फटका स्ट्रॉबेरीला बसत असून स्ट्रॉबेरी लवकर खराब होत आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीचे दर तीस ते चाळीस टक्क्यांनी उतरले आहेत, अशी माहिती पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळ बाजारातील विक्रेते अरिवद मोरे यांनी बुधवारी दिली.

दरघट!

डिसेंबर महिन्यात हंगाम सुरू झाल्यानंतर स्ट्रॉबेरीच्या दोन किलोच्या पेटीला घाऊक बाजारात अडीचशे ते तीनशे रुपये असा भाव मिळाला होता. सध्या स्ट्रॉबेरीच्या दोन किलोच्या पेटीचा भाव शंभर ते दीडशे रुपये आहे. स्ट्रॉबेरीची तुरळक आवक पुढे एप्रिल महिन्यापर्यंत सुरू राहील.

परराज्यातील मागणी घटली

स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू झाल्यानंतर मुंबई, दिल्ली, गोवा, हैदराबाद, गुजरात येथून चांगली मागणी असते. पण सध्या परराज्यातून येणारी स्ट्रॉबेरीची मागणी कमी झाली आहे. शहरातील पल्प उत्पादक आणि ज्यूस सेंटरच्या चालकांकडून स्ट्रॉबेरीला मागणी आहे. परराज्यातील मागणी कमी झाल्याने मिळेल त्या भावात स्ट्रॉबेरीची विक्री करावी लागते. किरकोळ बाजारात स्ट्रॉबेरीच्या पनेटची (प्लास्टिकचे छोटे खोके) २५ ते ३० रुपये दराने विक्री सुरू आहे. हंगामाच्या सुरुवातीला किरकोळ विक्रेत्यांकडून पनेटची विक्री ५० ते ६० रुपये दराने केली जात होती, असे विक्रेत्यांनी सांगितले.

आंब्याची चलती..

आंब्याची आवक बाजारात सुरू झाल्यानंतर अन्य फळांना फारशी मागणी नसते. संपूर्ण बाजार आवारात आंब्याची चलती असते. त्यामुळे आंबा हा खऱ्या अर्थाने फळांचा राजा मानला जातो. राज्यातील घाऊक बाजारातही आंब्यांची आवक सुरू झाली आहे.