पुणे : शहरात कठोर निर्बंध शनिवारपासून जारी करण्यात आल्यानंतर सायंकाळी सहाच्या आत घरात पोचण्याच्या लगबगीत असणारे हजारो वाहनचालक रस्त्यावर असल्याने शहरभर कोंडी झाली. शहरातून उपनगराकडे जाणाऱ्या बहुतांश मार्गावर कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

शहरातील दुकाने, खासगी कार्यालये सायंकाळी सहापर्यंत खुली ठेवण्याची मुभा प्रशासनाने दिली आहे. सहानंतर संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आल्यानंतर शनिवारी (३ एप्रिल) खासगी कार्यालये तसेच दुकानातील कर्मचारी, व्यावसायिक दुकाने, कार्यालये बंद करून साडेपाचच्या सुमारास घरी निघाले. पीएमपी सेवा बंद ठेवण्यात आल्याने अनेक महिला कर्मचारी दुचाकीवरून कामावर आल्या होत्या. काहींना त्यांच्या नातेवाइकांनी कामावर सोडले होते. सहानंतर संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आल्याने प्रत्येकालाच घरी पोचण्याची  घाई होती. त्यामुळे शहरातील सर्व रस्त्यांवर सायंकाळी पाचनंतर मोठय़ा संख्येने वाहने आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. मोटारी, दुचाकी, रिक्षा तसेच अवजड वाहनांमुळे शहरातून उपनगरांकडे जाणाऱ्या सर्व मार्गावरील वाहतूक कमालीची संथ झाली होती.

कारवाईच्या भीतीमुळे लगबग

’सायंकाळी सहानंतर संचारबंदीचे आदेश लागू होत असल्याने प्रत्येकाला घरी पोहोचण्याची घाई होती. कार्यालयीन कामकाज आटोपून घरी वेळेत पोहोचण्यासाठी अनेकांनी सायंकाळी पाचपूर्वीच काम संपवले.

’व्यावसायिकांनी दुकाने सायंकाळी साडेपाच पूर्वीच बंद केली. दुकानातील कर्मचारी, व्यापारी वर्ग गडबडून गेला होता. उशीर झाला तर कारवाई होईल, अशी भीती प्रत्येकाच्या मनात होती. त्यामुळे शहरातील सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली.