पुणे : देशभरातील टाळेबंदी ३ मेपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर शहरातील संचारबंदी तसेच जमावबंदीचे आदेश कायम राहणार आहेत.

पुणे शहर तसेच परिसरात संचारबंदी तसेच जमावबंदीचे आदेश मंगळवापर्यंत (१४ एप्रिल) कायम होते. त्यानंतर सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सुधारित आदेश लागू केले. शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. पोलिसांनी शहरात निर्बंध लागू केले आहेत. शहरातील आणखी २२ भागात मंगळवारी रात्री कठोर निर्बंध घालण्यात आले. टाळेबंदीचा कालावधी वाढवल्यानंतर शहरातील संचारबंदी तसेच जमावबंदीचे आदेश ३ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कायम राहणार आहेत, असे डॉ. शिसवे यांनी कळविले आहे.

नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे. अत्यावश्यक काम असेल तर पोलिसांच्या लिंकवर संपर्क साधावा. डिजिटल परवाना उपलब्ध करून दिल्यानंतर नागरिकांना कामानिमित्त बाहेर पडता येईल.

विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात कारवाई करण्यात येईल. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी १० ते १२ या वेळेत खुली राहणार आहेत. नागरिकांनी किरकोळ खरेदी करण्यापेक्षा एकाचवेळी जास्त मालाची खरेदी करावी, असे आवाहन डॉ. शिसवे यांनी केले आहे.

मध्य प्रदेशात निघालेल्या मजुरांना परत पाठवले

पुणे : टाळेबंदीनंतर शहरातून मूळगावी परतण्याचा प्रयत्न करणाऱ्या मध्य प्रदेशातील मजुरांना बुधवारी पहाटे पोलिसांनी कात्रज भागात अडवले. पोलिसांनी पायी जात असलेल्या १०० ते १२५ जणांची समजूत काढून त्यांना पुन्हा घरी पाठवले. कात्रज भागातील अंजलीनगर येथे पहाटे १०० ते १२५ मजूर कुटुंबीयांबरोबर पायीपायी जात होते. पहाटे चारच्या सुमारास कात्रज परिसरात पोलिसांच्या पथकाने मजुरांना पाहिले. त्यांच्याकडे विचारणा केली. टाळेबंदी उठलेली नाही. आम्हाला मूळगावी परतायचे आहे, अशी विनंती मजुरांनी पोलिसांकडे केली. पोलिसांनी त्यांची समजूत घातली आणि धीर दिला.‘तुम्ही आता घरी राहा, अशा परिस्थितीत घर सोडणे योग्य ठरणार नाही. तुमची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यासाठी प्रयत्न केले जातील,’ असे आश्वासन पोलिसांनी दिले. त्यानंतर मजूर आणि कुटुंबीय पुन्हा परत फिरले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, याप्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे पोलिसांनी सांगितले.