पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राइस प्लेट खाण्यासाठी आणि मौज मजा करण्यासाठी एका ज्येष्ठ महिलेची पर्स हिसकावून मिळालेल्या पैशातून १५ दिवस राइस प्लेटचा आस्वाद घेतल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थी अल्पवयीन असून त्यांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पर्समध्ये मिळालेला मोबाइल ५ हजार रुपयांना मित्रांना विकण्यात आला होता.

सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी भोसरी येथून सुनीता शशिकांत कुलकर्णी या ६३ वर्षीय ज्येष्ठ महिलेची पर्स दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी हिसकावली होती. याप्रकरणी महिलेने भोसरी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू कऱण्यात आला होता. चोरी करणारी दोन्ही मुले अल्पवयीन असल्याचं समोर आलं असून त्यांनी मौज मजा आणि राइस प्लेट खाण्यासाठी उपद्वयाप केल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे.

दोन्ही अल्पवयीन आरोपी हे महाविद्यालयात शिक्षण घेत असून ११ वी आणि १२ वीत आहेत. हे दोघे मित्र असून त्यांना मौज मजा आणि राइस प्लेट खाण्याची आवड होती. खिशात पैसे नव्हते म्हणून त्यांनी चोरी करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी ज्येष्ठ महिलेची पर्स हिसकावली. त्यामध्ये १६० रुपये आणि दोन फोन होते. दोघांनी त्याचा मित्राला साधा फोन ५० रुपये आणि स्मार्टफोन ५ हजार रुपयात विकला.

मिळालेल्या पैशातून दोघांनी १५ दिवस राइस प्लेटचा आस्वाद घेतला. एवढेच नाही तर त्यांनी नवीन चप्पल घेतली आणि उरलेल्या पैशातून मौज मजा केली. परंतु ५ हजार रुपयांना ज्या मित्राला स्मार्ट फोन विकला होता त्याने MPSC ची तयारी करत असलेल्या तरुणाला ७ हजार रुपयांना मोबाईल विकला. मोबाईल सुरू केल्यानंतर भोसरी पोलिसांनी ट्रॅक करत MPSC ची तयारी करत असलेल्या तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता घटना उघडकीस आली. याप्रकरणी दोन्ही अल्पवयीन आरोपींना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून मोबाइल आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.