सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड कम्प्युटिंगतर्फे (सी-डॅक) पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेवर विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. जानेवारीत झालेल्या परीक्षेत तांत्रिक अडचणी आल्याचे स्पष्ट करत पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय सी-डॅकने घेतला आहे. मात्र पुनर्परीक्षेच्या विरोधात सुमारे चाळीस विद्यार्थ्यांनी सी-डॅकच्या कार्यालयासमोर मंगळवारी आंदोलन केले.

अभियांत्रिकी पदवीधरांसाठी सी-डॅककडून पदविका अभ्यासक्रम राबवला जातो. देशभरातील विद्यार्थी या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा देतात. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२१ च्या वर्गासाठीची प्रवेश परीक्षा ऑनलाइन आणि प्रॉक्टर्ड पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. १० व १७ जानेवारीला परीक्षा होणार होती. १० जानेवारीला परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी आल्याने परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना १७ जानेवारीला परीक्षा देण्यास सांगितले. १७ जानेवारीलाही काही विद्यार्थ्यांना अडचणी आल्या. त्यामुळे ३१ जानेवारीला परीक्षा घेण्याचे जाहीर झाले. ३१ जानेवारीच्या परीक्षेत अडचणी आलेल्या काही विद्यार्थ्यांनी पुन्हा ३ फेब्रुवारीला परीक्षा दिली. त्यानंतर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र आता ही पूर्ण परीक्षा प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे जाहीर करून पुनर्परीक्षा घेण्याबाबत सी-डॅकने जाहीर केले आहे, असे आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांनी सांगितले.

सी-डॅकच्या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी नोकरी सोडून परीक्षा दिली आहे. त्यामुळे पुनर्परीक्षा घेण्याचा सी-डॅकचा निर्णय अन्यायकारक आहे. करोनामुळे आधीच या परीक्षेला उशीर झाला आहे. अभ्यासक्रमाचे वेळापत्रक बिघडले आहे. त्यामुळे दोन-तीन महिने वाया गेले आहेत. झालेल्या परीक्षेत तांत्रिक अडचणी आलेल्या संबंधित विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा सी-डॅकने घ्यावी. सर्वच विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेणे अन्यायकारक आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रॉक्टर्ड पद्धतीने ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांकडून बऱ्याच तक्रारी आल्याचे आढळून आले. इंटरनेट जोडणी, परीक्षेदरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणी विद्यार्थ्यांनी तक्रारीत नमूद केल्या होत्या. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देण्यासाठी आणि परीक्षेची गुणवत्ता राखण्यासाठी पुनर्परीक्षा घेतली जाईल. पुढील दोन ते तीन दिवसांत परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातील. विद्यार्थ्यांना नोंदणीकृत ईमेल आणि लघुसंदेशाद्वारे कळवल्या जातील. परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आणि पॅटर्न आधी जाहीर केल्याप्रमाणेच असेल.

– आदित्य सिन्हा, अध्यक्ष, शैक्षणिक व्यवस्थापन समिती, सी-डॅक