परीक्षा केंद्राचे ठिकाण भलतेच दिसल्यामुळे विद्यार्थी सेटपासून वंचित
महाविद्यालयीन शिक्षकांच्या नियुक्तीसाठी घेण्यात येणाऱ्या पात्रता परीक्षेच्या (सेट) प्रवेश पत्रावरील परीक्षा केंद्राचे ठिकाण दिसण्याऐवजी मोबाईलवरील ट्रॅकरवर वेगळेच ठिकाण दिसल्यामुळे काही विद्यार्थ्यांना रविवारी परीक्षेपासून वंचित राहावे लागले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट घेण्यात येते. ही परीक्षा रविवारी (२९ मे) झाली. परीक्षेच्या प्रवेश पत्रावर दिलेले परीक्षा केंद्र नेमके शहरात कुठे आहे, हे पाहण्यासाठी त्याचा शोध काही विद्यार्थ्यांनी मोबाईल ट्रॅकरवर घेतला.
ज्या संस्थेत परीक्षा केंद्र होते त्याच्या नावातील साधम्र्यामुळे त्याच संस्थेच्या दुसऱ्या शाखेचे ठिकाण मोबाईल ट्रॅकरवर दिसत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. विद्यार्थी मूळ केंद्रावर पोहोचेपर्यंत पहिल्या पेपरची परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची वेळ टळून गेली होती. पहिल्या पेपरसाठी उशिरा पोहोचल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील दोन परीक्षाही देता आल्या नाहीत. ‘सेट विभागाने प्रवेश पत्रावर केंद्राचा पत्ता आणि नाव योग्य प्रकारे लिहिले नव्हते.
पुण्यातील सर्व भागांची माहिती नसल्यामुळे केंद्राचा शोध मोबाईल ट्रॅकरवर घेतला. त्यावेळी शहराच्या दुसऱ्याच भागात केंद्र असल्याचे दिसले. तिकडे गेल्यावर परीक्षा केंद्र वेगळे असल्याचे लक्षात आले. मात्र मूळ केंद्रावर पोहोचेपर्यंत उशीर झाल्यामुळे परीक्षाला बसण्यासाठी मज्जाव करण्यात आला,’ अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली.