इयत्ता दहावीचा बदललेला अभ्यासक्रम आणि कृतिपत्रिकांना अनुसरून विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती दूर करण्यासाठी बालभारतीकडून तिसरा सराव संच उपलब्ध करून दिला जाणार आहे.

बालभारतीच्या संकेतस्थळावर कृतिपत्रिका प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी या कृतिपत्रिकांद्वारे सराव करायचा आहे. सोडवलेल्या कृतिपत्रिका शिक्षकांकडून, पालकांकडून तपासून घ्यायच्या आहेत. कृतिपत्रिका प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची संक्षिप्त उत्तरपत्रिका संकेतस्थळावरच उपलब्ध करून दिली जाईल. या उत्तरपत्रिकेद्वारे विद्यार्थ्यांनी आपण सोडवलेली कृतिपत्रिका तपासून पाहायची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या चुका दुरुस्त करता येतील. सर्व प्रथम भाषा, द्वितीय भाषा, संयुक्त भाषा आणि तृतीय भाषांच्या कृतिपत्रिका २८ जानेवारीला, तर उत्तरपत्रिका ४ फेब्रुवारीला उपलब्ध होतील. भाषेतर सर्व विषयांच्या, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, विज्ञान आणि तंत्रज्ञान, गणित या विषयांच्या कृतिपत्रिका ५ फेब्रुवारीला आणि उत्तरपत्रिका १० फेब्रुवारीला मिळतील.