‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’चे (एफटीआयआय) संचालक प्रशांत पाठराबे यांनी बुधवारी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांकडून आपली छळवणूक झाल्याचा आरोप केला. या विद्यार्थ्यांनी मला काही काळासाठी कार्यालयात अडवून धरले आणि अपशब्द उच्चारल्याचे पाठराबे यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. सोमवारी मी पाच ते सहा विद्यार्थ्यांना माझ्या कार्यालयात चर्चा करण्यासाठी बोलावले होते. मात्र, त्यावेळी अचानकपणे ४०-५० विद्यार्थी माझ्या कार्यालयात शिरले. त्यानंतरही मी या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. परंतु, या चर्चेअंती मी माझा निर्णय सांगितल्यानंतर या विद्यार्थ्यांनी मला कार्यालयातून बाहेर पडण्यास मज्जाव केला. सुरूवातीला मी पोलीसांना बोलवणार नव्हतो. मात्र, विद्यार्थी काही केल्या ऐकतच नसल्याने मला पोलीसांना बोलवायला लागले, असे पाठराबे यांनी यावेळी सांगितले. हे सर्व विद्यार्थी माझ्याभोवती साखळी करून उभे होते. यावेळी त्यांनी मला उद्देशून अनेक अपशब्दही उच्चारले. तसेच त्यांनी कार्यालयातील फोनच्या वायर्स आणि सामानाची नासधूस केली. संस्थेची बदनामी करण्यासाठी हा सर्व प्रकार करण्यात आल्याचे पाठराबे यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. विद्यार्थ्यांचा हे वर्तन असहनीय असून अशा वातावरणात याठिकाणी काम करणे अशक्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.