सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी मिळूनही त्या प्रमाणपत्राचा काही उपयोग नाही, अशी परिस्थिती काही विद्यार्थ्यांची झाली आहे. एकाच विद्यार्थ्यांला इंग्रजीतून वेगळ्या आणि मराठीतून वेगळ्या नावाचे प्रमाणपत्र विद्यापीठाने दिले आहे. चुकांबाबत तक्रार करूनही अद्यापही विद्यार्थ्यांना सुधारित प्रमाणपत्रे मिळू शकलेली नाहीत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रांमध्ये असलेल्या चुकांनी यावेळीही विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. यावर्षी विद्यापीठाने इंग्रजी आणि मराठीतून पदवी प्रमाणपत्र दिले. मात्र काही विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी प्रमाणपत्रे वेगवेगळ्या नावाची मिळाली आहेत. नावेच वेगळी असल्यामुळे प्रमाणपत्राच्या वैधतेबाबतच प्रश्न उपस्थित होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्राचा वापर कोठेही अर्ज करण्यासाठी करता येऊ शकत नाही. नावांमधील चुकांबाबत विद्यापीठाकडे तक्रार करूनही अद्यापही सुधारित प्रमाणपत्र मिळाले नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. याशिवाय नाव, जन्मतारीख, आई-वडिलांचे नाव अशा तपशिलातही चुका झाल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.
यावर्षी विद्यापीठाने पदवी स्तरावरील प्रमाणपत्रांचे वितरण करण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपवली. विद्यापीठाचा पदवीदान समारंभ फेब्रुवारीमध्ये झाला. प्रत्येक महाविद्यालयांमध्ये सध्या पदवीदान समारंभ होत आहेत. परीक्षा, विविध उपक्रम यांमुळे अजूनही काही महाविद्यालये पदवीदान समारंभाचे आयोजन करू शकलेली नाहीत. या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना अद्यापही प्रमाणपत्रे मिळू शकलेली नाहीत. उशिरा प्रमाणपत्रे मिळत असल्यामुळे त्यातील चुकाही विद्यार्थ्यांना उशिरा लक्षात येतात. त्यानंतर महाविद्यालयाकडे, विद्यापीठाकडे चुकांबाबत तक्रार केल्यानंतर सुधारित प्रमाणपत्र मिळण्यासाठी आणखी उशीर होत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
याबाबत एका विद्यार्थ्यांने सांगितले, ‘काही ठिकाणी नोकरीसाठी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दोन्ही मागितले जाते. मात्र गुणपत्रक आणि प्रमाणपत्रावर माझ्या नावाचे स्पेलिंग वेगळे दिसत आहे. याबाबत तक्रार केली आहे. मात्र अजून सुधारित प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही.’ याबाबत विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.