सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा सवाल

राज्य सरकारने खरेदी केलेल्या तुरीची मूळ किंमत १३०० ते १३५० कोटींची आहे, तर मग दोन हजार कोटींचा घोटाळा कसा होईल?, असा सवाल राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी विरोधकांना केला. विरोधक बिनबुडाचे आरोप करीत असून हल्लाबोल आंदोलन करणाऱ्यांनी चिंतन करण्याची गरज आहे, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने आयोजित आंबा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभानंतर देशमुख पत्रकारांशी बोलत होते. मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार या वेळी उपस्थित होते. तूरखरेदी, शेतकरी कर्जमाफी, कथित चहा घोटाळा यांबाबत त्यांनी भाष्य केले.

देशमुख म्हणाले, राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून १३०० ते १३५० कोटी रुपयांची तूर खरेदी केली. त्यापैकी दीड लाख टन तूर भरडून डाळ केली. स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमांतून त्याची विक्री सुरू आहे. तर, ९० टक्के तूर शिल्लक आहे, असे असतानाही तूर खरेदीत दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप बिनबुडाचा आहे.

शेतकरी कर्जमाफीबाबत ते म्हणाले, राज्यस्तरीय बँकर्स समितीने (एसएलबीसी) आकडेवारी सादर केल्यानुसार त्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली पाहीजे. कर्जमाफीसाठी मुदतवाढ दिली असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत. मागील सरकारच्या काळात कर्जमाफी योजनेंतर्गत अपात्र असलेल्यांना १५८ कोटी रुपये दिले होते. त्यापैकी १०४ कोटी रुपये वसूल झाले असून, उर्वरित रक्कम वसूल केली जात आहे. रुपी बँकेच्या सुनावणीच्या कामासाठी वेळ देता येत नसल्याने सुनावणीची जबाबदारी सहकार सचिवांकडे सोपविण्यात आली आहे.  पणन मंडळाच्या वतीने उत्पादक ते ग्राहक योजनेअंतर्गत आंबा महोत्सव आयोजित केला आहे. महोत्सवात नैसर्गिकरीत्या पिकविलेला कोकणातील  आंबा मार्केटयार्ड येथील कृषी पणन मंडळाच्यानजीक पन्नास स्टॉलवर रास्त दरात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पुणेकरांनी महोत्सवाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहनही देशमुख यांनी केले.

विरोधकांना चहा पाजण्याची सवय नसेल

पाहुण्यांचा पाहुणचार करणे ही संस्कृती आहे. मुख्यमंत्र्यांना गरीब शेतकऱ्यासह राज्य, परराज्य आणि परदेशातील शिष्टमंडळे कामानिमित्त भेटत असतात. अनेक बैठका होतात. चहावर खर्च झाला म्हणजेच एवढय़ा नागरिकांची आवक-जावक झाली आहे. मात्र, आमच्या काळात चहावर एवढा खर्च झाला नसल्याचे कोणीतरी सांगितले. त्यांना चहा पाजण्याची, काम घेऊन येणाऱ्यांशी चर्चा करण्याची सवय नसेल. त्यामुळे त्यांच्या काळात चहावर खर्च झाला नसेल, अशी टिप्पणी देशमुख यांनी केली.