20 January 2019

News Flash

उत्पादन दुप्पट झाल्यामुळे साखरेच्या दराला घरघर?

यंदा ९० लाख टनांहून अधिक नवी साखर उत्पादित होण्याचा अंदाज आहे.

साखर ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

गतवर्षी राज्यात मागील दहा वर्षांच्या तुलनेत साखरेचे नीचांकी उत्पन्न झाले असताना यंदा ते दुप्पट होण्याच्या मार्गावर आहे. यंदा ९० लाख टनांहून अधिक नवी साखर उत्पादित होण्याचा अंदाज आहे. सध्या केंद्राच्या निर्णयामुळे साखर कारखान्यांवर साखरेचा साठा बाजारात आणण्यास बंधने घालण्यात आल्यामुळे दरांमध्ये काहीशी वाढ झालेली दिसून येत असली, तरी मोठय़ा प्रमाणावर होणारे उत्पादन लक्षात घेता पुढील काळात साखरेच्या दरांना पुन्हा घरघर लागण्याची शक्यता असल्याचे मत अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मागील वर्षी साखरेचे उत्पादन घटल्यानंतर साखरेचे किरकोळ बाजारातील दर प्रतिकिलो ४० रुपयांच्याही पुढे गेले होते. ठोक बाजारात प्रतिक्विंटल ३८०० रुपयांपेक्षा अधिक दर झाला होता. २०१०-११ नंतरची ही सर्वाधिक वाढ होती. साखरेच्या वाढीव उत्पन्नाच्या अंदाजानंतर मागील काही दिवसांपासून साखरेच्या दरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर घट होत असल्याचे दिसून आले. साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र शासनाने साखर कारखान्यांकडील साठय़ावर नुकतेच नियंत्रण आणले आहे. त्यानुसार फेब्रुवारी अखेपर्यंत कारखान्यांना ८३ टक्के, तर मार्च अखेपर्यंत ८६ टक्के साठा शिल्लक ठेवावा लागणार आहे. त्यामुळे सुमारे क्विंटलला २९०० रुपयांपर्यंत केलेला साखरेचा दर सध्या ३१०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मात्र, हंगामात मोठय़ा प्रमाणावर साखर उत्पादन होणार असल्याने पुढील काळात साखरेचे भाव गडगडतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

एफआरपीची स्पर्धाही थांबली!

मागील गळीत हंगामामध्ये उसाचे क्षेत्र कमालीचे घटल्याने साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस मिळणेही कठीण झाले होते. शेतकऱ्याने आपल्याकडे ऊस गाळपास द्यावा, यासाठी खासगीबरोबरच सहकारी साखर कारखान्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर स्पर्धा निर्माण झाली होती. एफआरपी (रास्त व किफायतशीर भाव) २२०० ते २३०० रुपये असताना ऊस मिळविण्यासाठी काही कारखान्यांनी पहिला हप्ता २४०० ते २५०० रुपयांनी शेतकऱ्यांना दिला होता.

स्पर्धेचा परिणाम म्हणून ऊस उत्पादकांना नोटाबंदीनंतरच्या काळातही ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र  होते. ७० कारखान्यांनी १५ जानेवारी २०१७ पर्यंत शेतकऱ्यांना ‘एफआरपी’नुसार  शंभर टक्के रक्कम दिली, तर ५७ कारखान्यांनी शंभर टक्क्यांहून अधिक म्हणजेच ‘एफआरपी’पेक्षाही अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली होती. यंदा मात्र हे चित्र पूर्णत: पालटले असून, ‘एफआरपी’बाबत पुन्हा तक्रारी सुरू झाल्या आहेत.

  • मागील वर्षी २०१६-२०१७ च्या गळीत हंगामामध्ये राज्यात उसाचे क्षेत्र कमालीचे घटले होते. राज्यात गतवर्षी केवळ ४२ लाख टन साखरेचे उत्पादन होऊ शकले.
  • २०१५-२०१६ मधील गळीत हंगामात सुमारे ८४ लाख टन साखरेचे उत्पन्न झाले होते. साखरेचे उत्पन्न निम्म्याने कमी झाल्याने साखरेच्या दरांनीही चांगलीच उचल खालली होती.
  • यंदाच्या २०१७-२०१८ चा गळीत हंगाम अद्याप सुरू आहे. सध्या कोल्हापूर, पुणे, नगर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर विभागांमधील खासगी आणि सहकारी कारखाने मिळून एकूण १८३ साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू आहे.
  • या हंगामात १३ फेब्रुवारीपर्यंत ७३.२३ लाख टन साखरेचे उत्पन्न झाले आहे. याच दिवसापर्यंत मागील वर्षी केवळ ३९.५२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.
  • सध्याचा ऊस गाळपाचा वेग आणि उसाचे वाढीव क्षेत्र लक्षात घेता मार्च महिन्याच्या अखेपर्यंत उसाचे गाळप सुरू राहणार आहे. त्यामुळे साखरेचे उत्पन्न ९० लाख टनाच्याही पुढे जाण्याची शक्यता असल्याचे साखर आयुक्त कार्यालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

First Published on February 15, 2018 3:30 am

Web Title: sugar price issue sugar production