‘मेनका प्रकाशन’ च्या संस्थापक सुमनताई बेहेरे (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. प्रकाशन संस्थेचे संस्थापक (कै.) पु. वि. बेहेरे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या मागे दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
सुमनताई यांचा जन्म १२ मार्च १९२६ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे शिक्षणही मुंबईलाच झाले. पती पु. वि. बेहेरे यांच्यासमवेत त्यांनी प्रकाशन व्यवसाय सुरू केला. ‘मेनका’ (१९६०), ‘माहेर’ (१९६२) ही कौटुंबिक आणि ‘जत्रा’ (१९६३) हे विनोदी नियतकालिक सुरू केले. या तिन्ही नियतकालिकांना अल्पकाळातच वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. ‘मेनका प्रकाशन’च्या जाहिरात विभागाची धुरा सुमनताईंनी समर्थपणे सांभाळली. मुंबई-पुणे असा प्रवास करीत, अत्यंत कष्टाने दांडग्या लोकसंचयाच्या जोरावर त्यांनी प्रकाशनाची आर्थिक बाजू भक्कम केली. ‘मेनका’ आणि ‘माहेर’ मासिकांच्या विशेषांकांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली.
आचार्य अत्रे यांनी ‘मेनका’वर भरलेला खटला ही त्यांच्या आयुष्यातील अत्यंत खडतर बाब होती. परंतु त्या प्रसंगालाही त्यांनी धीराने तोंड दिले. बेहरे यांच्या निधनानंतर सुमनताई आणि त्यांच्या मुलींनी तब्बल दहा वर्षे ‘मेनका प्रकाशन’ची धुरा सांभाळली. तरुण वयात मुंबईला असताना सुमनताईंनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासमवेत काम केले होते. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या वाढीसाठी काम करणाऱ्या सुमनताई या काही काळ मंडळाच्या अध्यक्षाही राहिल्या.