राज्याच्या बहुतांश भागांत सध्या कमाल- किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. पुढील काही दिवसांमध्ये दिवसा उन्हाचा कडाका आणि रात्री उकाडा वाढणार आहे. या आठवडय़ात विदर्भ, दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील अनेक ठिकाणी कमाल तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

सोमवारी मराठवाडा, विदर्भातील कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली. कोकण विभागासह इतर ठिकाणी तापमान सरासरीच्या आसपास होते, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच अचानकपणे उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह वाहू लागले होते. त्याचवेळी राज्यातील आकाशाची स्थिती निरभ्र असल्याने रात्री आणि पहाटेची थंडी अवतरली होती. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत खाली आला होता. त्यामुळे तीन ते चार दिवस रात्री आणि पहाटे गारवा जाणवत होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात वाढ झाली. त्याचप्रमाणे उन्हाच्या झळा जाणवत असल्याने कमाल तापमानातही वाढ सुरू झाली आहे.

कोकण विभागामध्ये सर्वच ठिकाणी तापमान सरासरीच्या आसपास आहे. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर आणि नाशिकसह मुंबई, सांताक्रूझ आणि डहाणू येथे कमाल तापमानाचा पारा ३० अंशांखाली आहे. राज्यात इतर सर्व ठिकाणी ३३ ते ३७ अंशांवर कमाल तापमान आहे. नगर, सोलापूर, सांगली, मराठवाडय़ातील परभणी, बीड, विदर्भातील अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर आदी भागामध्ये कमाल तापमानाचा पारा ३६ ते ३७ अंशांवर पोहोचला आहे. सोमवारी राज्यातील उच्चांकी तापमान नगर आणि सोलापूर येथे ३७.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार

कमाल  किमान

मुंबई (कु.)      २९.६    २१.५

सांताक्रूझ       २९.९.०  २१.५

रत्नागिरी       ३०.७   २०.७

पुणे               ३३.१      १६.६

जळगाव        ३३.०   १९.४

कोल्हापूर       ३३.८   १८.३

महाबळेश्वर     २९.०   १८.२

नाशिक       २९.४   १६.६

औरंगाबाद      ३३.५   १९.०

परभणी        ३६.६  १९.५

चंद्रपूर        ३६.४  २०.८

नागपूर         ३६.२   १९.५

यवतमाळ       ३५.०   २०.०