राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यानंतर कोण राष्ट्रपती होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या रंगली असून मागील माहिन्यापासून शरद पवार यांच्या नावाची राष्ट्रपतीपदासाठी चर्चा सुरू आहे. आज पुण्यात एका कार्यक्रमानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे म्हणाले की, देशाला महाराष्ट्राचा राष्ट्रपती पुन्हा एकदा मिळाला तर मला आनंदच होईल. त्यातही शरद पवार जर राष्ट्रपती झाले तर अधिक आनंद होईल. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही सर्वांच्या सहमतीने होण्याची गरज असून या निवड प्रक्रियेत सर्व पक्षांना बरोबर घेण्याची आवश्यकता आहे. त्याच बरोबर शरद पवार यांच्या सारखा अनुभवी नेता त्या पदावर विराजमान झालेला देशाला पहायला नक्कीच आवडेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारचा विरोध करायला काँग्रेस कमी पडली असे म्हणत त्यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला.