पुणे : धायरीतील  मुरलीधर लायगुडे रुग्णालयातील बंद करण्यात आलेले स्वॅब केंद्र मंगळवारी पूर्ववत सुरू करण्यात आले. त्यामुळे धायरी, माणिकबाग, आनंदनगर, हिंगणे, विठ्ठलवाडी, वडगाव बुद्रुक परिसरातील करोना संशयित रुग्णांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणी नियमित होणार असून शेकडो रुग्णांची गैरसोयही टळली आहे.

केंद्र बंद असल्यामुळे रुग्णांची होत असलेली हेळसांड ‘लोकसत्ता’ने वृतमालिकेद्वारे पुढे आणली होती. सनसिटी, हिंगणे, वडगांव धायरी, आनंदनगर, माणिकबाग, धायरी परिसरातील संशयित रुग्णांच्या घशातील स्रावांचे नमुने घेण्याची सुविधा महापालिकेकडून लायगुडे रुग्णालयात उपलब्ध करुन देण्यात आली होती. येथे दिवसाला सरासरी शंभराहून अधिक संशयित व्यक्तींच्या घशातील स्रावांचे नमुने घेतले जात असतानाच सोमवारपासून (७ सप्टेंबर) अचानक ते बंद करण्यात आले होते. लायगुडे रुग्णालयातील ही सुविधा बंद करताना संशयित रुग्णांनी स्वॅब तपासणीसाठी सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानातील केंद्रात जावे असा आदेश सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून काढण्यात आला होता. या केंद्रात  आरटीपीसीआर स्वरूपाच्या केवळ पंधरा ते वीस चाचण्या होत असून लायगुडे रुग्णालयाजवळील पोकळे शाळेतही प्रतिजन (अँटीजेन) चाचण्या मर्यादित होत आहेत.

करोना संसर्ग मोठय़ा प्रमाणावर वाढत असताना आणि धायरी करोनाचा नवा हॉटस्पॉट ठरत असताना हे केंद्र बंद करण्याच्या सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या निर्णयावर चोहोबाजूने टीका झाली होती. महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त विक्रम कुमार, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी हे केंद्र तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले होते. अतिरिक्त आयुक्त  शंतनू गोयल यांनीही केंद्राला भेट दिली होती. तर, शिवसेनेसह अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही केंद्र तातडीने सुरूकरण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी केंद्र नियमित सुरू करण्यात आले. त्याचबरोबर करोना काळजी केंद्रही सुरू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. ‘लोकसत्ता’च्या पाठपुराव्यानंतर ही केंद्र सध्या सुरू करण्यात आले असून  येत्या दहा दिवसात प्राणवायू सुविधा यंत्रणा सुरू होईल, अशी ग्वाही अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांनी दिली. दरम्यान, लायगुडे रुग्णालयासाठी आवश्यक द्रवरुप प्राणवायूसाठी टाकी उभारण्याच्या प्रस्तावालाही मंगळवारी स्थायी समितीने मान्यता दिली. लायगुडे रुग्णालयासह दळवी, नायडू  आणि बोपोडीतील खेडकर रुग्णालयात अशी सुविधा कार्यान्वित करण्यासाठी एकूण ५३ लाख ८६ हजार ९३६ रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली.  शहरात करोना संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम लायगुडे रुग्णालयात करोना काळजी केंद्र सुरू करण्यात आले. गेल्या पाच महिन्यात ८ हजाराहून  जास्त रुग्णांची तपासणी लायगुडे रुग्णालयात करण्यात आली. तर, एप्रिलपासून ५०० करोनाबाधित रुग्णांवर येथे उपचार करण्यात आले आहेत. मंगळवारी केंद्र सुरू झाल्यानंतर खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, शिवसेनेचे स्थानिक नेते नीलेश गिरमे आणि महेश पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी रुग्णालयाला भेट दिली.