शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

पुणे :  ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष, ढोल-ताशांचा निनाद, तुतारीचा गजर आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके अशा वातावरणात शिवराज्याभिषेक दिन रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. शिवाजीनगर परिसरातील एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ  पुतळ्यासमोर भगव्या स्वराज्यध्वजासह ३१ फूट उंचीची शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार गिरीश बापट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रा. नितीन बानगुडे पाटील, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य बी. बी. आहुजा, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, श्रीमंत युवराज मालोजीराजे छत्रपती, श्रीमंत मधुरिमा राजे मालोजीराजे छत्रपती, समितीचे संस्थापक अमित गायकवाड यांच्यासह स्वराज्यघराण्याचे वंशज सहभागी झाले होते. राज्यातील ५१ गड-किल्लय़ांवर स्वराज्य घराण्यांच्या प्रतिनिधींनी स्वराज्यगुढी उभारली.

सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा दिन हा प्रत्येक मराठी माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून मोठय़ा स्वरूपात साजरा करण्याच्या संकल्पनेला सुरुवात झाली आहे. हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. पुढील वर्षी उत्कृष्ट शिवज्योत रॅलीचे आयोजन करणाऱ्या महाविद्यालयाला राज्य शासनाकडून पारितोषिक दिले जाणार आहे.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, छत्रपती शिवरायांचे लोककल्याणकारी कार्य प्रेरणादायी आणि नवी ऊर्जा देणारे आहे. शिवस्वराज्य दिन साजरा करण्याबरोबरच शासनाने राज्यातील गड-किल्ल्यांच्या रक्षणासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे.