स्वारगेट चौकात बांधण्यात आलेल्या पुलाचे शिवसेनेकडून उद्घाटन करण्यात आल्यानंतर या पुलाचे आता अधिकृत उद्घाटन शनिवारी होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होत असल्यामुळे त्यावरूनही राजकारण सुरू झाले आहे.
स्वारगेट चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच या चौकातील पादचाऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन त्यांच्या सोयीसाठी स्वारगेट चौकात उड्डाणपुलाचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. इंग्रजी वाय आकाराच्या या पुलाचा एक भाग पूर्ण झाला आहे. स्वारगेट एसटी स्थानक ते लक्ष्मीनारायण चित्रपटगृह या दरम्यानचा पूल पूर्ण झाला आहे. महापालिकेने या पुलाचे उद्घाटन करण्याआधीच शिवसेनेकडून गुरुवारी पुलाचे उद्घाटन करण्यात आले. त्या पाठोपाठ महापालिकेत दोन दिवस जोरदार हालचाली झाल्या आणि पुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शनिवारी (२० जून) ठरवण्यात आला. राष्ट्रवादीच्या नेत्यांना उद्घाटनासाठी वेळ नसल्यामुळे पुलाचे उद्घाटन लांबणीवर पडत असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन केले जाणार असले, तरी भारतीय जनता पक्षाने या पुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करावे अशी मागणी केली होती. तसे पत्रही भाजपतर्फे मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले होते. मात्र, त्या मागणीचा विचार न करता थेट अजित पवार यांना उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आल्यामुळे पुलाच्या उद्घाटनात राष्ट्रवादीनेही राजकारण केल्याचे भाजपचे म्हणणे आहे. शिवसेनेने उद्घाटनाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला असला, तरी पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांच्या हस्ते स्वारगेट चौकातील पुलाचे उद्घाटन करण्यात येईल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारीच सांगितले होते.
देशभक्त केशवराव जेधे यांचे नाव
स्वारगेट परिसरात बांधण्यात येत असलेल्या पुलाला ‘स्वारगेट उड्डाणपूल’ असे म्हटले जात असले, तरी या पुलाला देशभक्त केशवराव जेधे यांचे नाव द्यावे असा ठराव महापालिकेच्या मुख्य सभेने एकमताने संमत केला आहे. एक वर्षांपूर्वीच हा ठराव झालेला असून पुलाचे नामकरण तशाच पद्धतीने करावे याकडे उपमहापौर आबा बागूल यांनी शुक्रवारी महापालिका प्रशासन तसेच महापौर दत्तात्रय धनकवडे, सभागृहनेता बंडू केमसे आणि अन्य पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.